जंगलातील वणव्याकडे दुर्लक्ष
By admin | Published: March 13, 2016 01:28 AM2016-03-13T01:28:01+5:302016-03-13T01:28:01+5:30
एफडीसीएम मार्र्कं डा (कं.) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्र. २२९, २३० मधील एक किमी अंतरावरील जंगल जळून खाक होत आहे.
वन कर्मचारी सुस्त : आठवड्यातील दुसरी घटना; मार्कंडा (कं.) येथे उपाययोजनांचा अभाव
आष्टी : एफडीसीएम मार्र्कं डा (कं.) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्र. २२९, २३० मधील एक किमी अंतरावरील जंगल जळून खाक होत आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आठवड्यात दुसऱ्यांदा जंगलाला मोठ्या प्रमाणावर वणवा लागलेला आहे.
मार्र्कंडा (कं.) क्षेत्रातील कम्पार्टमेंटमध्ये जंगलाला शनिवारी आग लागली. या कक्षाचे वनरक्षक संकल्प उमरे यांच्याशी काही नागरिकांनी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही. याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी गुरनुले यांची नागरिकांनी विचारणा केली असता, वनकर्मचारी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आग लागलेल्या स्थळी कोणताही वनकर्मचारी उपस्थित झाला नाही. अथवा आग विझविण्याचाही प्रयत्न करण्यात आला नाही. वनपरिक्षेत्रात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र वनसंरक्षणाकडे कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या आठवड्यात सलग ही दुसरी घटना असून कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपण आॅफिसमध्ये आहोत, असे उत्तर देण्यात आले. मात्र पत्रकारांनी कार्यालय गाठताच आॅफिस बंद होते. लिपीक व कर्मचाऱ्यांनी काही वेळाने आॅफिस उघडले. त्यांची नावे विचारली असता, नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. जंगलातील वणवे रोखण्यास वनकर्मचारी किती तत्पर असल्याचे या सर्व प्रकारावरून दिसूून येत आहे. सदर कम्पार्टमेंट श्वेता थोरात यांच्या अखत्यारित येत असल्याने वणवे लागण्यास कुणाला जबाबदार धरले जाईल, याकडे लक्ष लागले आहे.
वणव्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी गुरनुले यांची विचारणा केली असता, वनकर्मचारी लाकूड, फाटे, लठ्ठे आणण्याच्या कामात लागल्याने वनसंरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अशा प्रकारच्या वणव्यांना आळा घालण्यास व वणवे विझविण्यास अपयश येत आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)