इग्नूतून मोफत शिक्षणाची संधी
By admin | Published: June 5, 2016 01:11 AM2016-06-05T01:11:53+5:302016-06-05T01:11:53+5:30
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
विभागीय संचालकांची माहिती : एससी, एसटींना यावर्षीपासून सवलत
गडचिरोली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शुल्कामध्ये सूट देण्यात आली असून एससी, एसटींना यावर्षीपासून मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती इग्नूचे विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना डॉ. शिवस्वरूप म्हणाले, इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठातून देशभरात ३० लाखांवर विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेत असून आत्तापर्यंत अनेकांनी पदवी मिळविली आहे. १८ ते ८० वयोगटापर्यंत या विद्यापीठांतर्गत व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांना शिक्षण घेता येते. इग्नू अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून गडचिरोली जिल्ह्यात या विद्यापीठाचा गडचिरोली नजीकच्या मुरखळा येथे सैनुजी पाटील कोवासे महाविद्यालयात केंद्र देण्यात आले आहे. इग्नूच्या पदवीबाबत कोणीही संशय ठेवू नये, या विद्यापीठांतर्गत अतिशय दर्जेदार पुस्तक साहित्य उपलब्ध करण्यात येते.
गडचिरोली जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांनी यंदा या विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे, असेही ते यावेळी म्हणाले, पत्रकार परिषदेला इग्नूचे सल्लागार डॉ. पुरूषोत्तम शुक्ला, चंद्रशेखर राजगुरे, प्राचार्य संतोष संगनवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)