कुकडी-विहीरगाव घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरूच
By admin | Published: June 3, 2016 01:21 AM2016-06-03T01:21:25+5:302016-06-03T01:21:25+5:30
गौण खनिजांचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करूनही आरमोरी तालुक्यातील ...
१५ ट्रॅक्टर कार्यरत : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
वैरागड : गौण खनिजांचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करूनही आरमोरी तालुक्यातील कुकडी-विहीरगाव घाटावरून मागील चार महिन्यांत २५ हजार ट्रॅक्टरपेक्षा अधिक रेतीचा उपसा झाला आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणाचेही अतोनात नुकसान होत आहे.
वैरागड तलाठी साजा क्रमांकात वैलोचना नदीघाट, करपडा घाट, खोब्रागडी घाट असे तीन घाट लिलाव प्रक्रियेने रेती कंत्राटदारांनी शासनाकडे महसूल भरून लिलावात घेतले. मात्र खोब्रागडी नदीवरील विहीरगाव तलाठी साजा अंतर्गत येणाऱ्या कुकडी-विहीरगाव घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र या घाटावरून वडधा, विहीरगाव, देलोडा, बोडधा, देशपूर, नरोटी, नरोटी चक व परिसरातील १० गावांतील ट्रॅक्टर मालक घाटावरून रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. कुकडी येथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या मार्गाने रोज १० ते १५ ट्रॅक्टर दिवस व रात्रभर रेतीची वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या लोकांना झोप लागत नाही.
या परिसरात सुरू असलेल्या शासकीय व खासगी बांधकामांना रेती पुरविली जात आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या आशीर्वादाने कुकडी-विहीरगाव घाटावरून रेतीचा अवैध उपसा केला जात आहे.
याबाबत मंडळ अधिकारी व्ही. डी. घरत यांना विचारणा केली असता, रेतीची तस्करी रात्री होत असल्याने आपण एकटा काहीच करू शकत नाही. तलाठ्यांनीही अवैध उत्खननावर लक्ष ठेवावे. आतापर्यंत १६ वाहनांवर कारवाई केली आहे, अशी माहिती दिली. तहसीलदार वलथरे यांनी अवैध रेतीचा उपसा होत असेल तर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. (वार्ताहर)