पेट्रोलची अवैध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:09+5:302021-05-29T04:27:09+5:30

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार ...

Illegal sale of petrol | पेट्रोलची अवैध विक्री

पेट्रोलची अवैध विक्री

Next

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपांवरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

गंजलेले खांब धाेक्याचे

काेरची : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कुरखेड्यात टिल्लू पंपांचा वापर

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळजोडणीची तपासणी करावी.

लाइनमनची पदे भरण्याची मागणी

एटापल्ली : वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत.

गृड्डीगुडम येथे मोकाट कुत्र्यांचा हैदोस

गृड्डीगुडम : परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या सुमारास कुत्री जाेरजाेराने भुंकत असतात. त्यामुळे नागरिकांची झाेपमाेड हाेते. स्थानिक प्रशासनाने माेकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

पाण्याचा अपव्यय

देसाईगंज : शहरात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोटी नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विनाकारण वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोटी बसविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंतर्गत रस्ते खड्डेमय

देसाईगंज : शहरातील पेट्रोल पंप ते हनुमान वाॅर्डातील साई मंदिरापर्यंत अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पादचारी, तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातही घडू शकतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शौचालय-मूत्रिघर बांधा

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रिघर उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दत्तमंदिरात सुविधा द्या

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे, परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून, मंदिर परिसरात सोयासुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

कोरचीत डास वाढले

कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. डासांमुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.

दुग्ध योजना राबवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्र्कं डा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

भूमिअभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

पूल निर्मितीची मागणी

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

अल्पवयीन बनले चालक

गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस चौकी सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी.

Web Title: Illegal sale of petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.