ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:36 AM2021-05-13T04:36:33+5:302021-05-13T04:36:33+5:30
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही ...
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोल पंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
रस्त्यालगतच्या वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
अनेक वाॅर्डांत सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते.
विटा बनविण्याच्या कामास सुरुवात
देसाईगंज : उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि.प. समोरील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत. या परिसरात आता जिल्हा परिषदेकडून शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारले जाणार आहे. मात्र महसूल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे.
मालेवाडा परिसर समस्यांच्या विळख्यात
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.
पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी
गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी
रांगी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी
एटापल्ली : राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी केरोसीनचे परिमान निश्चित केले आहे. केरोसीनचा कोटा कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आले आहेत. दुर्गम भागातील गावांमध्ये वीज राहत नाही. त्यामुळे केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी आहे.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली नजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे.
बँक अभावी विकासावर परिणाम
गडचिरोली : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे.
बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास हाेत आहे.
खड्डे बुजवा
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.
दिभना मार्ग अरूंद
गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे.