ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:54+5:302021-06-16T04:47:54+5:30
चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची ...
चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर रात्री व दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
फूटपाथ वाढल्याने रहदारीस अडथळा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इंदिरा गांधी चौक परिसरात मार्गावर फूटपाथ दुकानदारांनी विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने लावली आहेत. त्यामुळे चौक परिसरात तसेच त्रिमूर्ती चौकात रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त आहे.
अरुंद पूल दुरुस्त करण्याची मागणी
गुड्डीगुडम : सिरोंचा महामार्गावर नंदीगावजवळ अरुंद व ठेंगण्या स्वरूपाचा राल्लावागू नाल्यावर पूल आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीची मागणी होऊन संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावर जड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणचा पूल अरुंद असून तो कमी उंचीचा आहे. शिवाय या पुलावर कठड्यांची व्यवस्था नाही.
बेलगट्टा माल येथे प्रवासी निवारा द्या
चामोर्शी : तालुक्यातील घोट-चामोर्शी मार्गावरील बेलगट्टा माल येथे प्रवासी निवारा व हातपंप देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
अतिरिक्त वीज देयकाने नागरिक त्रस्त
एटापल्ली : ग्रामीण भागात कमी वीज वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे अधिक देयक आकारले जात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
देसाईगंज : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.
आरमोरी तालुक्यात वसतिगृहाची निर्मिती करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.
वीज तारानजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये वीज तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने वीज तारालगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात.
खताच्या ढिगाऱ्यामुळे शहरात दुर्गंधी
गडचिरोली : तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक गावात रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. त्यामुळे प्रशासनाने नाली स्वच्छतेच्या मोहिमेसोबत शेणखताच्या ढिगाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावामध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.
धोडराज मार्गाची दुरुस्ती करा
भामरागड : भामरागडवरून धोडराज अंदाजे पाच किमी अंतरावर आहे. या दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराज येथील नागरिक दर दिवशी भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.