ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:59+5:302021-07-29T04:35:59+5:30

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार ...

Illegal sale of petrol in rural areas | ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री

ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री

Next

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्राेल नेतात.

आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा

आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत.

माहितीसाठी केंद्र द्या

जोगीसाखरा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर योजनांची माहिती देणारे कार्यालय सुरू करावे.

तांत्रिक अडचणी दूर करा

आलापल्ली : जिल्ह्यातील अनेक गावात नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी अजूनही दूर झाल्या नाहीत. प्रशासनाने अडचणी दूर कराव्यात.

मोहीम थंडावली

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.

मोबाइल सेवा कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाइन कामे प्रभावित होत आहेत. विविध दाखले, तसेच प्रमाणपत्रे ऑनलाइन काढावी लागतात.

अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने, दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने, ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामांसाठी अहेरीत येथे राहते.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान- मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंनी अनेक हल्ले नागरिकांवर केले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट

कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे, परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे अपुरी आहेत. नागरिकांना ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर

चामोर्शी : शहरातील विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे, परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.

तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात

गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिक वसाहतीचे काम रखडले

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.

अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत, तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत. या इमारती काेसळून माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच

गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत, परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाड आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

वन विभागावर वाढला रिक्त पदांचा भार

गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूडतस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे; मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे; मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.

हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.

झुडूपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडूपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत.

प्रसाधनगृहाअभावी महिलांची कुचंबणा

चामाेर्शी : ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे; मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

Web Title: Illegal sale of petrol in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.