चांगल्या प्रसिद्धीतूनच उजळेल गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:05 AM2017-11-02T00:05:28+5:302017-11-02T00:05:48+5:30
या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही. प्रसार माध्यमांनी केवळ वाईट गोष्टींवरच बोट न ठेवता चांगल्या कामांनाही प्रसिद्धी दिली पाहीजे. त्यातूनच जिल्ह्याची प्रतिमा उजळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.
भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बुधवानी यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्रेहमिलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येथील अलंकार टॉकीजमध्ये बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, १९२ बटालियनचे कमांडंट मनोज कुमार, आणि आयोजक सलीम बुधवानी मंचावर विराजमान होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आज विकासाच्या प्रकाशापासून दूर आहेत. ८० गावांत अजूनही कित्येक वर्षात वीज पोहोचली नाही. अमडेली गावात मी वीज पोहोचविली. त्यावेळी तेथील लोकांच्या चेहºयावर दिसलेला आनंद मला आतापर्यंत वीज न पोहोचलेल्या सर्व गावकºयांच्या चेहºयावर पहायचा आहे. पण त्यासाठी अनेक अडचणी आहेत. अनेक परवानगींचे अडथळे पार करून ते काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्टÑीय एकात्मतेसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वक्त्यांनी बुधवानी यांचे कौतुक करून असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘ती’ बस होती केवळ चाचणीसाठी
अमडेली गावात महिनाभरापूर्वी पहिल्यांचा एसटी बस घेऊन पालकमंत्री पोहोचले. परंतु नंतर ती बस गावात गेलीच नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. त्याबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी म्हणाले, ती बस नियमित फेरीसाठी नेली नव्हतीच. गावात बस जाऊ शकते का, याची चाचणी घेण्यासाठीच ती बस नेली होती. परंतु रस्ता दुरूस्त झाल्यानंतर ती बस नियमितपणे गावात जाईल. तो रस्ता दुरूस्त करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले आहेत. निविदा प्रक्रिया आटोपून लवकरच हे काम सुरू होईल व नंतर बसफेरी सुरू केली जाईल, असे त्यांनी भाषणात सांगितले.