शहर विकास कामात दिसतो असमतोलपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:14+5:30
आरमोरी नगर पालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान, विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, दलित वस्ती व दलितेत्तर विकास निधीमधून रस्ते, नाली बांधकामे होत आहेत. नगर पालिकेमध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. या १७ ही वॉर्डात वीज, पाणी, रस्ते, नाली आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे.
विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून शहरात रस्ते व नाली बांधकामे केली जात आहेत. मात्र विकास कामांचे योग्य नियोजन करण्यात न आल्याने शहराच्या विकासात असमतोलपणा वाढला आहे. आवश्यकता असलेल्या वॉर्डात विकास कामे होत नसल्याने त्या भागातील नागरिक प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.
आरमोरी नगर पालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान, विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, दलित वस्ती व दलितेत्तर विकास निधीमधून रस्ते, नाली बांधकामे होत आहेत. नगर पालिकेमध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. या १७ ही वॉर्डात वीज, पाणी, रस्ते, नाली आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र शहर विकास तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबतच्या कामात समतोलपणाचा विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. विकसित भागाकडेच अधिक लक्ष देऊन तेथे लाखो रुपयांची कामे केली जात असल्याचे दिसून येते. शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये विरळ वस्तीत मुजबूत रस्ता असताना सुद्धा रस्ता बांधकाम करण्याची गरज नव्हती. मात्र गजानन नगरात लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सदर भागात दूर-दूर घरे असून वस्ती विरळ आहे. सदर वस्तीत रस्ते व नालींची कामेही केली जात आहेत. शहराच्या प्रगती चौकासमोर इटियाडोहलगत वस्ती आहे. या वस्तीत सर्वसामान्य व गरीब नागरिक वास्तव्य करतात. प्रभाग क्र. ३ मध्येच सीसी रोडचे काम झाले. मात्र ते विरळ वस्तीत झाले. गजानन नगर व प्रगतीनगर हे दोन्ही भाग एकाच प्रभागात येतात.
इटियाडोहलगत असलेल्या वस्तीमधील रस्ता पूर्णत: उखडला आहे. येथे नाली कामाचा अभाव आहे. अनेकदा मागणी करूनही या भागातील समस्यांकडे प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे.
शहराच्या वॉर्डातील विकासकामे नगरसेवक सुचवित असतात. कोणत्या ठिकाणी रस्ते, नाली बांधकाम पाहिजे त्यानुसार नियोजन बैठकीत चर्चा करून ही कामे मंजूर केली जातात. शहराच्या ज्या वस्तीत रस्ते बनविणे गरजेचे आहे, तिथे लक्ष देण्यात येईल.
- सचिन राऊत,
मुख्याधिकारी, न.प. आरमोरी
नगर परिषद प्रशासनाला रस्ते व नाली बांधकामाबाबत निवेदन देण्यात आले. तक्रार करून सुद्धा प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही. नगरसेवकांचे सुद्धा आमच्या वस्तीतील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
- कुंदन निकुरे,
नागरिक, प्रगतीनगर, आरमोरी