विनयभंग करणाऱ्यास तत्काळ अटक करा
By admin | Published: January 1, 2017 01:35 AM2017-01-01T01:35:13+5:302017-01-01T01:35:13+5:30
पळसगाव आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविकेवर विनयभंग करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम
जोगीसाखरा : पळसगाव आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविकेवर विनयभंग करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम यांच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कदम यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे.
पळसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका २५ डिसेंबरला कर्तव्यावर होती. एका आजारी महिलेला इंजेक्शन देण्यासाठी डॉ. कदम यांनी आरोग्य सेविकेला सांगितले. त्यानंतर काही वेळातच डॉ. कदम त्या ठिकाणी येऊन आरोग्य सेविकेच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग केला. याबाबतची तक्रार केल्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजुनही अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित आरोग्य सेविकेने केला आहे. पळसगाव येथील शासकीय निवासस्थानी आपण एकटेच राहत असल्याने आपल्या जीवितास धोका असल्याचेही म्हटले आहे. याबाबत देसाईगंजचे प्रभारी पोलीस निरिक्षक मानकर यांना विचारणा केली असता, आरोपी फरार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)