किसान निधीची अंमलबजावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:17 AM2019-02-07T01:17:02+5:302019-02-07T01:17:48+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या असल्या तरी शेतकºयांच्या आर्थिक स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. विद्यमान भाजपा सरकारने २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना दोेन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये अनुदान देण्याची योजना आणली आहे. या योजनेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे.
जमिनीसंदर्भातील माहिती महसूल विभागाकडेच असल्याने शेतकऱ्यांना केवळ आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध करून द्यायची आहे. विशेष म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार ०.५ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले २५ हजार ९१७ शेतकरी आहेत. ०.५ ते १ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले ३१ हजार ४२५ शेतकरी आहेत. तर १ ते २ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले ४१ हजार ४८८ शेतकरी आहेत, असे एकूण जिल्हाभरात जवळपास ९८ हजार ८३० शेतकरी होतात. ही आकडेवारी आठ वर्षांपूर्वीची आहे. आठ वर्षांत जमिनीचे तुकडे पडून शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या योजनेसाठी पात्र ठरणाºया शेतकऱ्यांची संख्या सव्वा लाखांच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधारकार्ड व बँकेचे पासबुक
तलाठ्याकडे जमा करा-तहसीलदार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत साजातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे जमा करायची आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवायची आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी केले आहे.
बुधवारी पार पडली सभा
गडचिरोली येथील गोंडवाना कलादालनात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीबाबतची सभा पार पडली. या सभेला नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सहायक निबंधक संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या सभेत किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे.