छेडखानी करणाऱ्या युवकास कारावास
By admin | Published: April 21, 2017 01:06 AM2017-04-21T01:06:32+5:302017-04-21T01:06:32+5:30
घरी झोपलेल्या वयस्क महिलेची छेडखानी करणाऱ्या युवकास येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावा
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल : दोन वर्षांची शिक्षा व दीड हजारांचा दंड
गडचिरोली : घरी झोपलेल्या वयस्क महिलेची छेडखानी करणाऱ्या युवकास येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रखनसिंह हॉटेलसिंह डांगी(२८) रा.मारकबोडी, ता.गडचिरोली असे शिक्षा झालेल्या दोषी युवकाचे नाव आहे.
८ एप्रिल २०१६ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ५० वर्षीय पीडित महिला घरी एकटीच झोपून असताना तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सासू आल्याचे समजून ती पुन्हा झोपी गेली. मात्र, गावातीलच रखनसिंह डांगी हा युवक दारुच्या नशेत घरात आल्याचे समजताच पीडित महिलेने त्यास निघून जाण्यास सांगितले. मात्र, रखनसिंहने तिचे दोन्ही हात पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने कशीबशी आपली सुटका करुन शेजारच्या महिलांना बोलावून आणले. यावेळी रखनसिंह हा शेजारच्या एका महिलेच्या घरी गेला होता. त्यानंतर पीडित महिलेने मुलीशी संपर्क करण्यासाठी मोबाईल बघितला असता, तोही आढळला नाही. यावरुन मोबाईलदेखील रखनसिंहनेच चोरुन नेल्याची खात्री पटताच पीडित महिलेने त्यास आवाज दिला. परंतु त्याने तिला अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस पाटलाने गडचिरोली पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी रखनसिंह डांगी याच्यावर भादंवि कलम ३५४, २९४, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अनंत कांबळे यांनी आरोपी रखनसिंह डांगी यास अटक करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गुरूवारी या प्रकरणाचा निकाल लागला. साक्षीदारांचा पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मुख्य न्यायदंडाधिकारी रोहन रेहपाडे यांनी आरोपी रखनसिंह डांगी यास दोन वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एल. एस. गजभिये यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर, शिपाई रेशमा गेडाम, सुभाष सोरते, पवन येवतकर यांनी जबाबदारी सांभाळली. (स्थानिक प्रतिनिधी)