घरकूल न बांधणाऱ्यास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:04 AM2019-02-09T01:04:13+5:302019-02-09T01:05:17+5:30
घरकुलाच्या रकमेची उचल करूनही घर न बांधणाऱ्या लाभार्थ्यास दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय रामलाल डोंगरे (४३) रा. गांधी वार्ड गडचिरोली असे शिक्षा झालेल्या लाभार्थ्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घरकुलाच्या रकमेची उचल करूनही घर न बांधणाऱ्या लाभार्थ्यास दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संजय रामलाल डोंगरे (४३) रा. गांधी वार्ड गडचिरोली असे शिक्षा झालेल्या लाभार्थ्याचे नाव आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता रमाई घरकूल योजनेंतर्गत डोंगरे यांना घरकूल बांधकामासाठी ७ मे २०१३ रोजी घरकूल बांधकामाचा ७५ हजार रूपयांचा पहिला हप्ता गडचिरोली नगर परिषदेने दिला.
परंतु संजय याने घर न बांधता संपूर्ण रक्कम इतर कामावर खर्च केली. याबाबत नगर परिषदेचे नगर रचना सहायक गिरीष कुमार मैंद यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये १६ मे रोजी तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार सोमेश्वर रोहणकर यांनी केला. दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंतर आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी आरोपीला दोन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून योगीता राऊत, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.