अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास कारावास
By admin | Published: January 14, 2017 12:51 AM2017-01-14T00:51:06+5:302017-01-14T00:51:06+5:30
भुलथापा देत पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.
जिल्हा न्यायालयाचा निकाल : २०१४ मध्ये गोमणीत घडली होती घटना
गडचिरोली : भुलथापा देत पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.
बोंदाजी वारलू दिवटीवार (४२) रा. गोमणी ता. मुलचेरा असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील आंध्रप्रदेश राज्यात लग्नसमारंभासाठी गेले होते. यावेळी आरोपी बोंदाजी दिवटीवार याने ६ जुलै २०१४ रोजी मुलीच्या घरी जावून घरातील दागीण्यांचा डब्बा हरविल्यामुळे लगाम येथील पुजाऱ्याकडे गेल्यास डब्बा मिळेल, अशी बतावणी करून स्वत:च्या दुचाकीवर बसवून तिला आलापल्ली मार्गाने जंगलामध्ये घेवून गेला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या बाबत कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला सिरोंचा येथे घेवून गेला व तिथेही अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दामपूर येथील बसस्थानकावर सोडून दिला. पीडित मुलगी आपल्या नातेवाईकासोबत आपल्या घरी आली व घडलेली हकीकत आपल्या आईस सांगितली. पीडित मुलीच्या आईने मुलचेरा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मुलचेरा पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३६३, ३६६, ३६७, ३७६, ५०६ भादंवि व कलम ४, ५ बाललैंगिक अत्याचार संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यानंतर ८ जुलै २०१४ रोजी आरोपी बोंदाजी दिवटीवार याला अटक करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात साक्षीदारांचे बयाण नोंदविल्यानंतर तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून शुक्रवार १३ जानेवारी रोजी आरोपीस ७ वर्ष कारावास व २ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी केला. (प्रतिनिधी)