बलात्कार करणाऱ्यास कारावास
By Admin | Published: September 30, 2016 01:28 AM2016-09-30T01:28:58+5:302016-09-30T01:28:58+5:30
पाहुणे म्हणून आलेल्या युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी सात वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सात वर्षांची शिक्षा : दोन हजार रूपये दंड ठोठावला
गडचिरोली : पाहुणे म्हणून आलेल्या युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी सात वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुरूषोत्तम ऊर्फ महागू मारोती कोकोडे (२६) रा. घाटी ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे. पीडित युवती ही घाटी येथे बहिणीकडे १२ ते १७ जानेवारी २०१३ दरम्यान पाहुणी म्हणून आली होती. आरोपी पुरूषोत्तमने तिच्याशी जवळीक साधून व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे पीडित युवती गर्भवती राहून ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे २७ सप्टेंबर २०१३ रोजी मुलीला जन्म दिला. आरोपीने पीडितेसोबत लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. सदर प्रकरण कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करून आरोपीला २९ सप्टेंबर २०१३ रोजी अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात पीडितेचे व इतर साक्षीदाराचे सरकारी पक्षातर्फे बयाण नोंदवून तसेच जणुकीय विश्लेषणाचा अहवाल ग्राह्य माणून तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून २९ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपीस कलम ३७६ आय अन्वये दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. या गुन्हाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी ए. एस. शेजाळ यांनी केला. (नगर प्रतिनिधी)