लैंगिक अत्याचार करणाऱ्यास कारावास
By Admin | Published: June 18, 2017 01:14 AM2017-06-18T01:14:29+5:302017-06-18T01:14:29+5:30
घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या दुकानात बोलावून लैंगिक कृत्य करणाऱ्या आरोपीस
दंड : जिल्हा न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या दुकानात बोलावून लैंगिक कृत्य करणाऱ्या आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश यु. एम. पदवाड यांनी दहा वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
राहुल राजकुमार शिंगाडे (२१) रा. आष्टी ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे फिर्यादीच्या सासऱ्याच्या चाळीमध्ये चप्पलचे दुकान आहे. फिर्यादीच्या मुलीची आरोपी राहुल शिंगाडे याच्याशी ओळख झाली. यामुळे ती नेहमी मामा म्हणून त्याच्याकडे येत - जात होती. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपीने पीडित मुलीला ती आपल्या घरासमोर खेळत असताना दुकानात बोलाविले. यावेळी तिच्यासोबत जबरी व लैंगिक कृत्य केले. याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले. पीडित मुलीच्या वडीलांनी मुलचेरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) भादंवी सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला १३ डिसेंबर २०१४ रोजी अटक केली. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र केले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण नोंदविल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून १७ जून रोजी आरोपीस दहा वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक खांदलकर यांनी काम बघितले.