गडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयातून हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:02 PM2020-09-28T21:02:30+5:302020-09-28T21:05:44+5:30
जादूटोणा केल्याच्या संशयातून एका इसमास ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका इसमास ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
रूपू डुकरू पुंगाटी(४१) व महारू दसरू गाडवे(३३) दोघेही रा. कोठी, तालुका भामरागड अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी त्यांच्याच गावातील दोबा गाडवे यांची ५ एप्रिल २०२० रोजी हत्या केली होती. दोबा व त्यांची पत्नी वारली हे शेतातील झोपडीत राहात होते. घटनेच्या रात्री आरोपी रूपू व महारू या दोघांनी दोबा यांची शेतातील झोपडी गाठून पती-पत्नीला झोपेतून उठविले. त्यानंतर तू माझ्या मुलीला जादू करून मारले, असे म्हणून महारू याने दोबाचे दोन्ही हात पकडून ठेवले तर रूपूने दोबाच्या डोक्यावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दोबाची पत्नी वारली हिने रूपूच्या हातातील कुºहाड हिसकावली. या झटापटीत वारली सुद्धा जखमी झाली. त्यानंतर रूपूने सोबत आणलेला लोखंडी घन दोबाच्या डोक्यावर मारला. यात दोबा जागीच ठार झाला.
याबाबतची फिर्याद वारली गावडे हिने कोठी पोलीस मदत केंद्रात केल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक मिथून सावंत यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी दोन्ही आरोपींना कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३०७, ३४ अन्वये १० वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच फिर्यादीस २० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे २८ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे हा निकाल देण्यात आला. सरकारी अभियोक्ता म्हणून एन. एम. भांडेकर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी पोलीस निरिक्षक प्रकाश तुनकलवार यांनी केली.