बँक खात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:21 PM2019-07-23T22:21:17+5:302019-07-23T22:21:51+5:30
एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त करीत ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढणाऱ्या महिलेला गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २३ जुलैैला साधा कारावास व ८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त करीत ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढणाऱ्या महिलेला गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २३ जुलैैला साधा कारावास व ८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
रोशनी अशोक लेमाडे (२४) रा. देगाव ता. रिसोड जि. वाशिम हल्ली मुक्काम गडचिरोली असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. रोशनी लेमाडे हिने गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील भारती धर्मदास गायकवाड यांचे खाते असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून त्यांना कुठलीही माहिती न देता लबाडीने एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच फिर्यादीची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त केले. त्याद्वारे ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन फसवणूक केली, अशी तक्रार फिर्यादीने गडचिरोली पोलीस ठाण्यात १६ मार्च २०१३ रोजी केली. या तक्रारीवरून कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४६७ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २३ जुलै २०१९ रोजी आरोपीविरूद्ध सबळ पुरावे असल्याचे निष्पन्न असल्याने गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी रोशनी लेमाडे यांना कलम ४१९ अन्वये एक वर्ष साधा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४२० अन्वये दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा, ४६८ अन्वये ३ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४७१ अन्वये ३ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपयांची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास १ महिन्याची साध्या कारावाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सरपे यांनी काम पाहिले.