तब्बल ११६ दलित वस्त्या सुधारणार
By admin | Published: September 13, 2016 12:55 AM2016-09-13T00:55:49+5:302016-09-13T00:55:49+5:30
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत...
पायाभूत सुविधांची कामे मंजूर : पावणे चार कोटी पंचायती समितीकडे वर्ग
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०१६-१७ या वर्षात ३ कोटी ७६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून बाराही तालुक्यातील ११६ दलित वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता, नाली, मोरी, विहीर व सौरदिवे बसविण्याची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा निधी पंचायत समितीला वळता करण्यात आला असून येत्या काही दिवसांत सदर कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ११६ दलित वस्त्या सुधारणार आहेत.
राज्य शासनाच्या ५ डिसेंबर २०११ व २० डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने पायाभूत सुविधा करण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार दलित वस्ती सुधार योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०१६-१७ या वर्षात ३ कोटी ७६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करून ११६ दलित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधांची अनेक कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदाळा, येवली, पारडी कुपी, राजगाटा चेक, डोंगरगाव, मारकबोडी, मौशिखांब, वसा, कुंभी, चांदाळा, कोटगल, कनेरी, नवरगाव, काटली, मुरमाडी, साखरा, राजगट्टा, धुंडेशिवणी, टेंभा, आंबेटोला, कळमटोला, अडपल्ली, अमिर्झा, चुरचुरा माल, महादवाडी व गुरवळा येथील दलित वस्त्यांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्याच्या ३५ दलित वस्त्यांमध्ये एकूण १ कोटी २३ लाख १३ हजार रूपयांचे कामे मंजूर करण्यात आली आहेत. आरमोरी तालुक्यातील २० दलित वस्त्यांमध्ये एकूण ८० लाख १४ हजार रूपयांची कामे मंजूर करण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील ९ दलित वस्त्यांमध्ये ४० लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. कोरची तालुक्यात कोचिनारा व जामनारा येथील दलित वस्त्यांमध्ये १६ लाखांची कामे तर धानोरा तालुक्यातील १० दलित वस्त्यांमध्ये ३९ लाखांची कामे मंजूर करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यातील १७ दलित वस्त्यांमध्ये ३८ लाख ४० हजारांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मुलेचरा तालुक्यातील येल्ला येथे चार लाखाचा रस्ता तसेच अहेरी तालुक्यातील वेलगूर, नवेगाव येथील दलित वस्त्यांमध्ये १४ लाख ४० हजार रूपयांची तर भामरागड तालुक्यातील येचली येथील दलित वस्तीमध्ये २ लाख रूपयातून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील रायपेट्टा, राजनापल्ली, गर्कापेठा व नारायणपूर या चार दलित वस्त्यांमध्ये २२ लाख रूपयांची सिमेंट काँक्रिट रस्ता व सौरदिवे बसविण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.
आणखी प्रस्ताव मागविले
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ३ कोटी ७६ लाख रूपयांतून ११६ दलित वस्त्यांमध्ये अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र गतवर्षी प्राप्त झालेला कोट्यवधी रूपयांचा निधी शिल्लक आहे. यातून जि. प. समाजकल्याण विभागाला ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्यासाठी जि. प. समाजकल्याण विभागाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कामांचे प्रस्ताव मागविले आहे.
४ कोटी ६२ लाखांतून दीडशे कामे होणार
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०१५-१६ या वर्षात मार्च अखेर दलित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकूण ८ कोटी ३८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. त्यानंतरही जि. प. समाजकल्याण विभागाकडे ४ कोटी ६२ लाख रूपये शिल्लक आहे. या उर्वरित निधीतून अनेक दलित वस्त्यांमध्ये दीडशे कामे करणे शक्य आहे. त्या दृष्टीने समाजकल्याण विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रस्ताव मागविले असून आतापर्यंत ग्रामपंचायतींकडून ७० प्रस्ताव प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे.