विकासकामे प्राधान्याने मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:28 PM2018-01-18T23:28:58+5:302018-01-18T23:29:08+5:30
अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अधिकाऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीकोणातून आपली कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. त्याचसोबत आवश्यक त्या प्रकरणी पाठपुरावा ठेवावा म्हणजे गडचिरोलीचे चित्र पालटेल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’च्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, बाबुराव कोहळे आदी उपस्थिती होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुनिलकुमार पठारे यांनी सभेत सर्वांचे स्वागत केले. केंद्र शासनाच्या योजना तसेच केंद्र राज्य सहकार्यातून चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा आजच्या सभेत घेण्यात आला.
अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत व पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव आहेत. निधी प्राप्त झाल्यावर त्याचे बांधकाम होईल परंतू धोकादायक शाळा तातडीने पाडून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंत्यांना यावेळी दिले. जारावंडी ते कसनसूर दरम्यान असलेला रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बस बंद झाली आहे. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा अशा सुचना खासदार नेते यांनी बांधकाम विभागास यावेळी दिल्या. सभेला विविध विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
११८ गावे उजळली
जिल्ह्यात वीज पुरवठा नसणाऱ्या गावांची संख्या २६७ इतकी आहे. यांच्या विद्युतीकरणासाठी नियोजन समितीने निधी देऊ केला आहे. यापैकी २१८ गावांचे विद्युतीकरण वीज वितरण कंपनी मार्फत होणार आहे. त्यातील ११८ गावांचे काम पूर्ण झाले.
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती अबंध निधी व तेंदू, बांबूतून झाल्या स्वयंपूर्ण
वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना पैसा मिळतो. त्यात आरोग्य, शिक्षण व इतर बाबींवर खर्चाचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. या खेरीज ८० टक्के ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत पाच टक्के अबंध निधी प्राप्त होतो. तसेच तेंदू आणि बांबू लिलावातून देखील ग्राम पंचायतींना उत्पन्न प्राप्त होत आहे. यामुळे आता ग्रामपंचायती स्वंयपूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी शासनाकडे निधीची मागणी न करता गावपातळीवर शिक्षण तसेच आरोग्य कामांसाठी ग्रामपंचायतींनी स्वत:चा निधी खर्च करावा अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सभेत केली . खासदार नेते यांनीही ही सूचना चांगली असून पदाधिकारी व सरपंचानी या पध्दतीने कामे करावी असे सभेत सांगितले.
ही गावे उजळली
अतिदुर्गम ४९ गावांमध्ये मेडाच्या माध्यमातून सौर उर्जेचा वापर करुन विद्युतीकरण प्रस्तावित आहे. यातील ४१ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १०० गावांचे विद्युतीकरण मार्च अखेर पूर्ण करेल, असे सभेत सांगण्यात आले. या १०० पैकी ८३ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेंतर्गत सहा हजार आणि बीपीएल अंतर्गत २६ हजार अशा एकूण ३२ हजार मोफत जोडण्या दिल्या जातील.
पेयजल योजना
ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी १८ गावांच्या योजनांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. या सर्व कामांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. मागील वर्षात ३६ कामांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी २० गावांमधील योजना पूर्ण झाल्या असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.