पाणी पुरवठ्यासाठी सुधारित डीपीआर बनणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:19+5:30
शहरातील नळ पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीच्या काळातील फार जुनी योजना आहे. लगतच्या वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून बोरमाळा घाटाच्या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरात जवळपास सात पाणी टाक्या असून वॉर्डावॉर्डात नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र जलकुंभांना बरीच वर्ष झाली असून पाईपलाईनही जुनी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील नळ पाणी पुरवठ्याच्या सुविधेत सुधारणा करून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नव्याने ३३ कोटींच्या कामांचा सुधारित डीपीआर पुन्हा शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. जुन्या योजनेतील पाणी टाकींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम नगर पालिका प्रशासनाने साकोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे सोपविले आहे.
शहरातील नळ पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीच्या काळातील फार जुनी योजना आहे. लगतच्या वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून बोरमाळा घाटाच्या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरात जवळपास सात पाणी टाक्या असून वॉर्डावॉर्डात नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र जलकुंभांना बरीच वर्ष झाली असून पाईपलाईनही जुनी झाली आहे. परिणामी शहरातील पाणी पुरवठ्याच्या सुविधेत दोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज राहात आहे. जलकुंभाच्या सभोवती संरक्षण भिंती नाहीत. शिवाय फिल्टर यंत्र, पम्पिंग मशिनरी व बऱ्याच ठिकाणचे वॉल्व जुने झाले आहेत. त्यामुळे या सर्वांची कार्यक्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील पाणी पुरवठ्याची सुविधा अद्यावत करण्यासाठी ३३ कोटींच्या कामांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर पाणी योजनेच्या कामांचा डीपीआर तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्याकडे सादर करण्यात आला. तेथून हा प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला. दरम्यान या प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे सदर प्रस्ताव न.प. कार्यालयाकडे परत पाठविण्यात आला.
आता पालिकेच्या वतीने त्रुटींची पूर्तता करण्यात आल्या असून ग्रा.पं.च्या काळातील जुन्या पाणी टाक्या निर्लेखित करण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी सुरूवातीला गडचिरोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे सोपविण्यात आली होती. मात्र येथील तज्ज्ञ प्राध्यापक दीर्घ रजेवर असल्याने हा प्रस्ताव साकोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे पाठविण्यात आला. तेथून आॅडीट अहवाल प्राप्त झाल्यावर पुन्हा सुधारीत डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नागपूर व मुंबई कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
अशी होणार कामे
पाणी पुरवठा योजनेच्या नवीन सुधारीत डीपीआरमध्ये दोन पाण्याच्या टाक्या, शहरात नळ पाईपलाईन, पम्पिंग मशीनरी, फिल्टर यंत्र तसेच आवश्यक असलेले वॉल्व आदींची कामे करण्यात येणार असल्याचे न.प.च्या सुत्रांनी सांगितले.
जलकुंभाची क्षमता वाढणार
ग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या पाणी टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येला अनुसरून छोट्या स्वरूपाच्या बांधण्यात आल्या. मात्र आता गडचिरोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी नळ योजनेचे पाणी अपुरे पडत आहे. सध्या अस्तित्वात असलेली गांधी चौकातील पाणी टाकी चार लाख लिटर तर गोकुळनगरातील एक लाख लिटर क्षमतेची आहे. नवीन डीपीआरनुसार गोकुलनगर येथे सात लाख लिटर क्षमतेची तर इंदिरा गांधी चौकात १४ लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात येणार आहे.