बालके पितात अशुद्ध पाणी

By admin | Published: August 7, 2015 01:16 AM2015-08-07T01:16:23+5:302015-08-07T01:16:23+5:30

जिल्ह्यात सर्वात कमी कुपोषित बालके अहेरी तालुक्यात आहेत. मात्र तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांकरिता शुद्ध पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था...

Impure water in children's mouth | बालके पितात अशुद्ध पाणी

बालके पितात अशुद्ध पाणी

Next

अहेरीच्या अंगणवाडीतील वास्तव : प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
अहेरी : जिल्ह्यात सर्वात कमी कुपोषित बालके अहेरी तालुक्यात आहेत. मात्र तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांकरिता शुद्ध पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अंगणवाडीतील बालकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. परिणामी विविध रोगांची लागण होऊन कुपोषणाची समस्या तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार शुद्ध पाण्याच्या अभावामुळे अंगणवाडीतील बालकांना उलटी, टायफाईड, अतिसार आदी रोगांची लागण होऊ शकते. जिल्ह्यात सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी काही दिवसांपूर्वी वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र अहेरी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर योग्य देखभालीअभावी धूळखात पडले आहे. परिणामी या केंद्रात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येणाऱ्या बालकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अहेरी तालुक्यात एकूण १९० अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी ९० टक्के अंगणवाडी केंद्रांमध्ये वॉटर फिल्टरचा पुरवठा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकाही अंगणवाडी केंद्रातील वॉटर फिल्टर वापरात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात आलेले वॉटर फिल्टर निकृष्ट प्रतीचे असल्याने अवघ्या आठ ते नऊ महिन्यात सारेच वॉटर फिल्टरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्यामुळे ते तसेच धूळखात पडले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन त्यांनी अंगणवाडी केंद्रातील परिस्थिती जाणून घेतली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दखल घेऊन अंगणवाडी केंद्रात आवश्यक साधन सामुग्रीचा पुरवठा करून संपूर्ण व्यवस्था करावी, अशी मागणी अहेरी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
अहेरी उपविभागात अनेक दुर्गम गावांमध्ये अंगणवाड्यांमधील परिस्थिती अशाच स्वरूपाची असून सरकारी यंत्रणेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)
९० केंद्रांना वॉटर फिल्टर मिळाले नाही
अहेरी बाल विकास प्रकल्पाअंतर्गत ७३ मिनी अंगणवाडी केंद्र व नव्याने सुरू करण्यात आलेले १७ अशा एकूण ९० अंगणवाडी केंद्रांना योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तालुक्यातील ३० अंगणवाडी केंद्रांमध्ये विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. तसेच १४४ केंद्रांमध्ये हातपंप व सहा केंद्रांमध्ये नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Web Title: Impure water in children's mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.