२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
By संजय तिपाले | Published: November 7, 2023 05:00 PM2023-11-07T17:00:49+5:302023-11-07T17:02:40+5:30
काही जण सिनेमाप्रमाणे ग्लिसरीन लावून रडतात
गडचिरोली : विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ९० टक्के आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण काही जण विचारधारेविरुद्ध निर्णय घेतल्याचे सांगून सिनेमात जसे ग्लिसरीन लावून रडतात तसे काही जण रडत आहेत, अशी खरमरीत टीका प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी केली. २००९ मध्येच लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत युतीची चर्चा राष्ट्रवादीत झाली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळावा ७ नोव्हेंबरला शहरातील चंद्रपूर रोडवरील एका लॉन्समध्ये झाला. यानंतर सुनील तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या सदस्या आबा पांडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर उपस्थित होते.
यावेळी तटकरे म्हणाले, भाजपसोबत युतीच्या चर्चा २००९, २०१४, २०१९ मध्येही झाल्या, पण त्यावर निर्णय का होऊ शकला नाही. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, त्याचाच एक भाग म्हणून सर्वांच्या संमतीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार, शेतकरी , महिलांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर यश मिळवले आहे. यामुळे जनमत अजित पवार यांच्यासोबतच आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा त्यांनी केला. लोकसभेला राज्यात महायुती ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करुन आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रितच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध
सकल मराठा समाजाने राज्यात यापूर्वी आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबध्द असल्याचे सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे कालमर्यादेत व टिकणारे आरक्षण द्यायचे असून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे याकरता प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले.