बाधगावात रानटी हत्तीने फोडला शेतकऱ्यांना घाम; रंगला पाठशिवणीचा खेळ
By संजय तिपाले | Published: August 22, 2023 05:27 PM2023-08-22T17:27:10+5:302023-08-22T17:30:26+5:30
पिटाळून लावण्यास गेलेल्यांचा केला पाठलाग
गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तीच्या कळपाने भलताच धुडगूस घातला आहे. कळपातून भरकटलेल्या एका हत्तीला देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत बाधगाव जंगलातून पिटाळून लावण्यासाठी २२ ऑगस्टला शेतकरी गेले. यावेळी बिथरलेल्या हत्तीने शेतकऱ्यांचा पाठलाग केला. त्यामुळे शेतकरी पुढे व हत्ती मागे असा पाठशिवणीचा खेळ रंगला.
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रातील वासी, उराडी , सोसरी या जंगलात चार दिवसांपासून हत्तीचा कळम मुक्कामी होेता. जोमात असलेल्या धानशेतीत हत्ती मिरवल्याने अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. मेहेर व इतर कर्मचाऱ्यांनी या कळपाला तेथून पिटाळून लावले. मात्र, कळपातून भरकटलेला एक हत्ती जंगलात अद्यापही ठाण मांडून असल्याचे कळाल्यावर स्थानिक शेतकरी त्यास पिटाळून लावण्यासाठी एकवटले. यावेळी हत्तीने शेतकऱ्यांचाच पाठलाग केला. हत्तीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली. वाट दिसेल तिकडे शेतकरी धावत होते, याची चित्रफित व छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते.
हत्तीचा बंदोबस्त करणार केव्हा?
दरम्यान, रानटी हत्तीने कुरखेडा, आरमोरी, कोरची तालुक्यात सर्वाधिक नुकसान केलेले आहे. धानशेतीचे तर नुकसान केलेच, पण काही घरांचीही नासधूस केली. वनविभागाकडून तुटपुंजे अर्थसहाय्य दिले जाते, परंतु रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाय कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.