भाजपच्या बालेकिल्ल्यात आज मित्रपक्ष राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:22 PM2023-11-07T12:22:08+5:302023-11-07T12:23:41+5:30
घड्याळ तेच, वेळ मात्र नवी : मंत्री धर्मरावबाबांना लोकसभेसाठी मिळेल का बळ?
संजय तिपाले
गडचिरोली : भाजपसोबत सरकारमध्ये मंत्री असलेले मातब्बर नेते धर्मरावबाबा आत्राम यांचे होमपीच असलेल्या गडचिरोलीत ७ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा होत आहे. दोन आमदार व एक खासदार यामुळे जिल्ह्यात भाजप सर्वाधिक ताकदीचा पक्ष आहे, पण भाजपच्याच बालेकिल्ल्यात मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) गट व्यूहरचना आखणार आहे. मंत्री धर्मरावबाबांच्या लोकसभा लढविण्याच्या निर्धाराला या मेळाव्यातून पक्षाकडून बळ मिळेल का, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नक्षलप्रभावित व राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत लोकसभेला भाजपचे अशोक नेते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. गडचिरोलीत विधानसभा मतदारसंघात डॉ. देवराव होळी व आरमोरीतून भाजपचेच कृष्णा गजबे यांनीही दोन वेळा विधानसभा गाठली. गतवेळी अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून मैदानात उतरून धर्मरावबाबा आत्राम यांनी पुतणे अम्ब्रिशराव आत्राम यांना पराभूत करत विधानसभेत कम बॅक केले होते. अलीकडच्या सत्तानाट्यात त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले, याची बक्षिसी म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तथापि, भाजपने गडचिरोलीचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायम ठेवले व धर्मरावबाबांना नजीकच्या गोंदियाचे पालकमंत्रिपद दिले. यातून भाजपने राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे. मंत्रिपद मिळण्याच्या आधीच धर्मरावबाबांनी लोकसभा लढविण्याचा निर्धार केल होता. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी पुढील राजकीय वाटचाल दिल्लीच्या दिशेने असल्याचे सूतोवाच वेळोवेळी केलेले आहे. या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबरला चंद्रपूर रोडवरील एका लॉनमध्ये सकाळी ११ वाजता होत असलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रदेशाध्यक्षांसह पाच आघाड्यांचे प्रमुख गडचिरोलीत
घड्याळ तेच वेळ नवी, अशी टॅगलाइन घेऊन हाेत असलेल्या या मेळाव्यात ७ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासोबतच महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, इतर मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, माजी जि. प. सभापती नाना नाकाडे यांची उपस्थिती राहणार आहे.
काय असेल राष्ट्रवादीचा अजेंडा?
विशेष म्हणजे सत्तानाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा जिल्ह्यातील हा पहिलाच मेळावा असून, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीतीत पक्ष काय अजेंडा मांडतो, घड्याळ तीच अन् वेळ नवी असली तरी ती कोणाचे नशीब बदलणार, धर्मरावबाबांना ताकद मिळेल का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम हे परिश्रम घेत आहेत.