बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास परिवाराला मिळणार २५ लाख रुपये मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:01 PM2024-11-29T15:01:16+5:302024-11-29T15:03:54+5:30
पाच वर्षांत पाच जणांनी गमावले प्राण : वाघ नसलेल्या ठिकाणी वावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मानवी व वन्यप्राणी संघर्ष नवीन नाही. व्याघ्र हल्ल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. ही स्थिती कमी-अधिक ठिकाणी बिबट्याचा संचार असलेल्या इतर जिल्ह्यांतही आहे. यानुषंगाने आता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबास देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत वाढ केली आहे.
जिल्ह्यात शहरी भागातील लोकवस्तीपासून ते ग्रामीण भागातील वाड्या, वस्तीपर्यंत बिबट्याचा वावर आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाकडून पिंजरे लावून बिबटे जेरबंद केले जातात. दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
अनेकदा बिबटे अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असतात. अनेकदा बिबट्या आणि मानवाचा संघर्ष बघायला मिळतो. बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक वेळा नागरिकांचा मृत्यू झाला, तर कधी जखमीदेखील झाले आहेत. यावर उपाययोजना आवश्यक आहे.
२० ऐवजी २५ लाख रुपये मिळणार
पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांना पाच लाख रुपये, नंतर दहा लाख रुपये मदत देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करून ही रक्कम २० लाखांपर्यंत नेली होती. मात्र, नव्या धोरणानुसार २५ लाख रुपये भरपाई म्हणून दिले जाणार आहेत.
या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत
बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड, नीलगाय, खोकड यांच्याकडून मानवी हल्ला झाल्यास आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. याशिवाय पशुधनाचीही हानी झाल्यास मदत देण्यात येते.
बिबट्याचा सर्वाधिक वावर या भागात
जेथे वाघाचा अधिवास आहे, तेथे शक्यतो बिबट्या जास्त वेळ थांबत नाही. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, गडचिरोली येथे बिबट्याचा अधिक संचार आहे.
जखमी, अपंगत्व आल्यास मदत मिळते का?
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च दिला जातो. मात्र, खासगी रुग्णालयात औषध उपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा ५० हजारपर्यंत प्रतिव्यक्ती आहे. शक्यतो औषध उपचार शासकीय जिल्हा रुग्णालयात अथवा शासकीय ग्रामीण रुग्णालयात करावा.
हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल
बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. मनुष्यहानी किवा पशुहानी झाल्यास त्याची माहिती ४८ तासांत वन विभागाला किंवा पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती शासनादेशात नमूद आहे.
वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी
मदतीची रक्कम देताना १० लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात. इतर रक्कम मुदतठेव स्वरूपात मृताच्या वारसाला दिली जाते. ही रक्कम पाच- पाच वर्षांच्या टप्प्याने काढण्याची परवानगी असते.
हल्ले कधी थांबणार?
जिल्ह्यात पाच वर्षामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली या भागात सर्वाधिक हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेबाबत योग्य ते उपाय करावेत, अशी मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.