अन् रात्री साडेआठ वाजता काढले मुख्याध्यापक मान्यतेचे आदेश; हेलपाटे मारून शिक्षक झाले हाेते त्रस्त
By दिलीप दहेलकर | Published: June 22, 2024 05:22 PM2024-06-22T17:22:05+5:302024-06-22T17:25:43+5:30
गडचिराेली जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडे सादर केले होते.
दिलीप दहेलकर,गडचिराेली : जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र, दाेन ते तीन महिने उलटूनही नियमातील प्रस्तावाला मान्यता देण्याला माध्यमिक शिक्षणाधिकारी विलंब करीत हाेते. दरम्यान, चकरा मारून त्रस्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षकांनी ही समस्या शिक्षक आमदारांकडे मांडली. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची कानउघाडणी झाल्यानंतर रात्री साडे वाजता शाळांच्या मुख्याध्यापक पद मान्यतेचे आदेश तयार करून ते लगेच प्रदान करण्यात आले.
गडचिराेली जिल्हा परिषदमध्ये रात्री मुख्याध्यापकांचे आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात बहुतांश अधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या बाहेरून येतात. खूप दूरवरून गडचिराेली जिल्ह्यात रूजू झालेले काही माेजके अधिकारी साेडले तर इतर सर्व अधिकारी स्वत:च्या जिल्ह्यात रजेवर गेले की, आठ ते दहा दिवस ते जिल्ह्याच्या सेवेत परतत नाही. परिणामी प्रशासकीय कामकाजाचा खाेळंबा हाेताे. असाच काहीसा अनुभव जि.प. च्या दाेन्ही शिक्षण विभागात अनेकांना येत आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी अधिकाऱ्यांची सभा बाेलावली. ही सभा दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत तब्बल ९ तास चालली. दरम्यान, अडबाले यांच्या आक्रमक पवित्र्याने जि.प. प्रशासन काहीसे वठणीवर आले. सभेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पद मान्यतेचे आदेश देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार, शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबाराव पवार, लेखाधिकारी चौधरी,विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, समशेर खाॅ पठाण, अजय वर्धलवार आदी उपस्थित हाेते.
तंबी दिल्यावर यंत्रणा लागली कामाला-
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचे विविध प्रश्न, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्नांवर सदर बैठकीत दिली. दरम्यान, शासन नियमाला धरून असलेल्या प्रस्तावांना प्रलंबित ठेवल्याचे पाहून आ. अडबाले यांनी तीव्र नाराजी दर्शविली. रात्री कितीही वाजले तरी प्रस्ताव निकाली निघाल्याशिवाय सभास्थळ सोडणार नाही, अशी तंबी सदर सभेत दिली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी कामाला लागले.
या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आर्डर-
जिल्ह्यातील ९ माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पद मान्यतेचे आदेश देण्यात आले. यामध्ये गडचिराेली येथील शिवाजी हाॅयस्कूल, गाेकुलनगर, वसंत विद्यालय, चामाेर्शी येथील शिवाजी हायस्कूल, सिंधूताई पाेरेडीवार हायस्कूल गाेगाव, शिवाजी हायस्कूल, कुरखेडा, कै. महेश सावकार पाेरेडीवार हायस्कूल चातगाव, शिवाजी हायस्कूल पाेर्ला आदी शाळांचा समावेश आहे.