गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा व्याघ्रबळी; २ किमीपर्यंत फरफटत नेऊन केले ठार

By गेापाल लाजुरकर | Published: October 8, 2022 04:14 PM2022-10-08T16:14:12+5:302022-10-08T16:31:14+5:30

दहा महिन्यांत १७ वा बळी

In Gadchiroli district, for the second day in a row farmer was killed in tiger attack | गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा व्याघ्रबळी; २ किमीपर्यंत फरफटत नेऊन केले ठार

गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा व्याघ्रबळी; २ किमीपर्यंत फरफटत नेऊन केले ठार

Next

आरमोरी (गडचिराेली) : धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंध आणण्यासाठी दोन सहकाऱ्यांसाेबत जंगलात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आरमाेरी तालुका मुख्यालयापासून अगदी १० किमी अंतरावरील रामाळा जंगलातील कक्ष क्रमांक ४१ मध्ये शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सिंध कापण्याच्या कामात विलंब झाला अन् एकटे पडलेल्या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.

आनंदराव पांडुरंग दुधबळे (६५) रा. रामाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव पांडुरंग दुधबळे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसाेबत शनिवारी सकाळी सायकलने रामाळा-वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते सिंध कापण्यात व्यस्त असताना एकटे पडले. याचवेळी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.

वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

दुपारी १ वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता. घटनेची माहिती मिळताच वडसाचे सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे, कमलेश गिन्नलवार, विकास शिवणकर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच घटनास्थळी बेड व ट्रॅप कॅमेरे लावले. आरमोरी तालुक्यातच शुक्रवारी देशपूर येथील गुराख्याला ठार केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडली.

...अन् सहकारी हाक मारतच राहिले

आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास दाेन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: In Gadchiroli district, for the second day in a row farmer was killed in tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.