गडचिराेली शहरात नवमतदारांसह महिलांमध्ये प्रचंड उत्साह केंद्रांवर भरदुपारी रांगा : सावलीसाठी मंडप अन् थंड पाण्याची व्यवस्था
By दिलीप दहेलकर | Published: April 19, 2024 02:40 PM2024-04-19T14:40:18+5:302024-04-19T14:46:22+5:30
Lok Sabha Election 2024: कडक उन्हाची पर्वा न करता नवमतदारांसह, महिला, वृद्ध असो वा अपंग गडचिराेली शहरातील मतदारांमध्ये अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला.
गडचिराेली : कडक उन्हाची पर्वा न करता यंदाच्या लाेकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांसह महिला मतदारांमध्ये गडचिराेली शहरातील अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला. शहराच्या महात्मा गांधी नगरपरीषद शाळेच्या केद्रावर भर दुपारी १ . १५ वाजता मतदारांची माेठी रांग दिसून आली. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून गडचिराेली
जिल्हयात दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान आहे. त्यामुळे येथील बहुतांश केंद्रांवर सकाळपासून तर दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकत इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. युवकांनी दिव्यांग व अपंगांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व्हिलचेअरचा आधार दिला. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर पोलिस, होमगार्ड, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी कर्तव्यावर होते. केंद्रावर कॅनव्दारे थंड पाण्याची सुविधा पुरविण्यात आली. प्रशासनाने ठिकठिकाणी सेल्फ़ी पॉईंट उभारून मतदारांना केंद्रावर येण्यासाठी प्राेत्साहीत केले. मतदारांना घरोघरी चिठ्ठ्यांचे वितरण झाल्यानंतरही अनेक राजकीय पक्षांच्या बुथवर जावून मतदारांनी आपली चिठ्ठी घेण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी दीड वाजतापर्यंत शहरात व परीसरात मतदान शांततेत सुरू हाेते.
पती एका तर पत्नी दुसऱ्या केंद्रावर
निवडणूक विभागाने मतदार याद्या अपडेट केल्या तरी अनेकांच्या नावात छाेटया माेठया चुका दिसून आल्या. एकाच घरात राहून पती एका केंद्रावर तर पत्नीने दुसऱ्या केंद्रावर जावून आज मतदान केले. गडचिराेली शहराच्या गाेकुलनगरातील अनेक मतदारांच्या बाबतीत असा अनुभव या निवडणुकीत आला. पतीला चामाेर्शी मार्गावरील जि. प. शाळेच्या तर पत्नीला शासकीय विज्ञान काॅलेजच्या बुथावर मतदानासाठी जावे लागले. सदर प्रकार प्रत्यक्ष मतदारांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना सांगितला.