गडचिरोलीत सात गावांमध्ये नक्षल्यांना गावबंदी, नक्षल्यांचा गड असलेल्या गावांनी दाखवली हिंमत

By दिगांबर जवादे | Published: June 16, 2024 04:14 PM2024-06-16T16:14:41+5:302024-06-16T16:19:10+5:30

नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही!

In Gadchiroli, Naxalites have been banned in seven villages, the villages that are strongholds of Naxalites have shown courage. | गडचिरोलीत सात गावांमध्ये नक्षल्यांना गावबंदी, नक्षल्यांचा गड असलेल्या गावांनी दाखवली हिंमत

गडचिरोलीत सात गावांमध्ये नक्षल्यांना गावबंदी, नक्षल्यांचा गड असलेल्या गावांनी दाखवली हिंमत

दिगंबर जवादे, गडचिराेली: नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत विविध शासकीय याेजनांचा लाभ दिला जात आहे. भामरागड तालुक्यातील धोडराज येथे कृषी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव धाेडराज पाेलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला.

नक्षल्यांना बंदी घातलेली सातही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित आहेत. माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसरात ही गावे येतात. या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते, तसेच गावातील काही सदस्यांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आयाेजित केले. येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यात यशस्वी झाल्याने पोलिस दलाच्या प्रति गावक­ऱ्यांचा विश्वास दृढ झाला. अलीकडील काळात या परिसरात इरपनार येथे मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात आली.

नक्षलवाद्यांकडून पोलिस खब­ऱ्या असल्याच्या संशयावरून निष्पाप गावक­ऱ्यांच्या हत्या व मारहाण केली जात हाेती. नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे नक्षलवादी जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून १४ जून रोजी धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये वरील सात गावांतील गावक­ऱ्यांनी नक्षल गावबंदी ठराव संमत केला.
सदरची कार्यवाही यशस्वीरीत्या पार पाडण्यास भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, पोलिस स्टेशन धोडराजचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी काैतुक केले आहे.

नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही!

कोणत्याही नक्षलवादी संघटनेस जेवन, रेशन, पाणी देणार गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना नक्षलवादी संघटनेत सहभागी करून घेणार नाही. त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही. नक्षलवाद्यांच्या मिटिंगला जाणार नाही. त्यांच्या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे ठरावात म्हटले आहे.

Web Title: In Gadchiroli, Naxalites have been banned in seven villages, the villages that are strongholds of Naxalites have shown courage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.