आरोग्य सेवेत दुर्गम गडचिरोलीचा राज्यात दबदबा, सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थान

By संजय तिपाले | Published: September 19, 2023 04:20 PM2023-09-19T16:20:24+5:302023-09-19T16:20:43+5:30

वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो.

In health care, remote Gadchiroli dominates the state, tops for the second year in a row | आरोग्य सेवेत दुर्गम गडचिरोलीचा राज्यात दबदबा, सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थान

आरोग्य सेवेत दुर्गम गडचिरोलीचा राज्यात दबदबा, सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थान

googlenewsNext

गडचिरोली: पायाभूत सुविधांचा अभाव, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरपाड्यांवर दळणवळणाची अपुरी साधने असताना खडतर प्रवास करत आरोग्यसेवा पुरविण्यात येथील यंत्रणेला यश आले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) गुणांकनात १०० पैकी ९२ गुण घेऊन राज्यात अव्वलस्थान पटकावले. जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो. यामध्ये आरोग्य विभागाकडून केले जाणारे लसीकरण, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, तपासणी, उपचार,  गरोदर माता व नवजात बालकांची तपासणी, उपचार, प्रसूती आदी विविध सेवांची नोंद केली जाते. विविध आरोग्यसेवांच्या प्रत्यक्ष कामानुसार गुणांकन केले जाते. या प्रणालीचे अंतिम गुणांकन १९ सप्टेंबरला जाहीर झाले. यात गडचिरोलीने २०२२- २३ मध्ये अव्वल क्रमांक मिळवला. यापूर्वी २०२१- २२ मध्येही प्रथम स्थान पटकावले होते. यंदा गडचिरोलीनंतर पुणे जिल्ह्याने ९१ गुणांसह द्वितीय तर परभणीने ८९ गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. यवतमाळ चौथ्या स्थानी असून ८८ गुण मिळाले आहेत. 

गडचिरोलीत खडतर परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांची ही पावती आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. अधिक दर्जेदार व उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहोत.
- डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली
...

पायाभूत सुविधांचे हवे बुस्टर
जिल्ह्याने आरोग्य सेवेत एकीकडे राज्यात प्रथम स्थान पटकावले असले तरी भामरागड, सिरोंचा यांसारख्या दुर्गम तालुक्यांत अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना कावड करुन किंवा झोळीतून दवाखान्यात नेले जाते तर कधी मृतदेह दुचाकीला बांधून न्यावा लागतो. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभपणे देता याव्यात यासाठी रुग्णवाहिका, पक्के रस्तेे, मुबलक मनुष्यबळ, दर्जेदार सुविधा मिळणे गरजेचे आहे.

Web Title: In health care, remote Gadchiroli dominates the state, tops for the second year in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.