अवघ्या तीन महिन्यांत मोठ्यानंतर लहान भाऊही ठरला व्याघ्रबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 09:58 PM2022-10-25T21:58:50+5:302022-10-25T21:59:43+5:30

Gadchiroli News सोमवारी गडचिरोली तालुक्याच्या कळमटोला गावात प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) हे शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले.

In just three months, after the elder, the younger brother also became a tiger victim | अवघ्या तीन महिन्यांत मोठ्यानंतर लहान भाऊही ठरला व्याघ्रबळी

अवघ्या तीन महिन्यांत मोठ्यानंतर लहान भाऊही ठरला व्याघ्रबळी

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील दोघांना मारल्याने निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

गोपाल लाजुरकर

गडचिरोली : जिल्ह्यात वाघ- बिबट्यांचे हल्ले होण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी गडचिरोली तालुक्याच्या कळमटोला गावात प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) हे शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी मृतकाचा मोठा भाऊसुद्धा व्याघ्रबळी ठरला होता. एकाच कुटुंबातील दोन कर्ते पुरुष वाघाचे बळी ठरण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांसमोर आता वाघांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घरीच बसावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जीवाची जोखीम पत्करून जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतात जावे, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

गावालगतच्या शेतशिवारात स्वमालकीची गुरे चारत असताना प्रभाकर यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील कळमटोला येथे सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. प्रभाकर निकुरे हे सकाळी ११ वाजतानंतर आपली गुरे घेऊन अन्य चार गुराख्यांसोबत गावापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात गेले होते. ते दररोज दिभना मार्गावरील त्याच भागात गुरे चारायचे. सोमवारी जंगलालगत गुरे चारत असताना प्रभाकर निकुरे हे जंगलाच्या बाजूने उभे होते. याचवेळी वाघाने त्यांच्यावर झडप घेतली आणि त्यांना फरफटत ६० ते ७० मीटर अंतरावर नेले.

सोबतच्या गुराख्यांनी वेळीच याबाबतची माहिती गावात व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सायंकाळी मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. निकुरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. जंगलालगत गुरे चारू नये, असे वनविभागाकडून वारंवार सांगितले जात असतानाही लोक जुमानत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

मानेला पकडून सहज उचलून नेले

वाघाने हल्ला करताच जवळपास असणाऱ्या गुराख्यांनी आरडाओरड केली; परंतु, वाघाचा प्रतिकार करण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. निकुरे यांची मान पकडून वाघ त्यांना सहज उचलून घेऊन गेला, मात्र सहकारी गुराख्यांच्या ओरडण्यामुळे थोड्याच वेळात काही अंतरावर त्यांना टाकून वाघ जंगलात पळून गेला, तोपर्यंत प्रभाकर निकुरे यांचा जीव गेला होता.

कुटुंबावर दुसरा आघात

मृतक प्रभाकर निकुरे यांचे मोठे भाऊ खुशाल निकुरे हेसुद्धा गुरे चारत असतानाच २८ जुलै रोजी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी धुंडेशिवणीपासून तीन किमी अंतरावरील पिपरटोल्याच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. प्रभाकर हे कळमटोला तर खुशाल हे धुंडेशिवणी येथे राहात होते. तीन महिन्यांत निकुरे कुटुंबावर वाघामुळे दुहेरी आघात झाला.

Web Title: In just three months, after the elder, the younger brother also became a tiger victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ