सिराेंचा नगरपंचायतीत अनोखा याेग; बहीण नगराध्यक्ष तर भाऊ उपाध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 11:46 AM2022-02-18T11:46:37+5:302022-02-18T11:49:37+5:30
सिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शेख फरजाना यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्ष बनलेले बबलू पाशा हे शेख फरजाना यांचे सख्खे भाऊ आहेत.
काैसर खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा (गडचिराेली) : स्थानिक नगरपंचायतीच्या सत्तेची चावी आता आदिवासी विद्यार्थी संघाकडे आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शेख फरजाना यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्ष बनलेले बबलू पाशा हे शेख फरजाना यांचे सख्खे भाऊ आहेत.
आदिवासी विद्यार्थी संघाने राष्ट्रीय पक्षांना धूळ चारत सिराेंचा नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली. सिराेंचा नगरपंचायतीत आविसंने आपली ताकद दाखवत एकूण १७ जागांपैकी १० जागांवर विजय मिळविला. बबलू पाशा यांनी आविसंचे उमेदवार निवडून यावे, यासाठी प्राण पणाला लावले हाेते. यात ते यशस्वी झाले. नगराध्यक्षपदाचे तेच मुख्य दावेदार हाेते. मात्र, नगराध्यक्षाची जागा आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी नगराध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी स्वत:ची लहान बहीण फरजाना शेख यांच्याकडे साेपविली व ते स्वत: उपाध्यक्ष बनले आहेत.
बहीण नगराध्यक्ष व भाऊ उपाध्यक्ष बनल्याची ही सिराेंचाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कदाचित, जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असावी. एकाच घरी दाेन माेठी पदे आली असली, तरी आपण सर्व सदस्य व शहरातील नागरिकांना साेबत घेऊनच याेग्य ताे निर्णय घेऊ, असा आशावाद बबलू पाशा यांनी व्यक्त केला आहे.