जिल्ह्यात ५,५५२ शेतकऱ्यांनी केले शेतीचे मातीपरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:07 PM2024-05-02T16:07:27+5:302024-05-02T16:14:18+5:30
Gadchiroli : ३७२८ शेतकऱ्यांना मिळाल्या आरोग्य पत्रिका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मानवी शरीराचे आरोग्य सुदृढ राहिल्यास व्यक्ती चांगले कार्य करते, त्याचप्रमाणे जमिनीचे आरोग्य कसे आहे हे जाणने महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५५५२ शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून घेतले. तपासणी केलेल्या पैकी ३ हजार ७२८ शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यातील ६४० शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य तपासले. चामोर्शी तालुक्यातील ३२५, मुलचेरा ३०९, धानोरा १००९, देसाईगंज ६००, आरमोरी ३५२, कुरखेडा ५२१, कोरची २, अहेरी ७०६ व सिरोंचा तालुक्यातील २३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मृदा तपासणीमधून शेतकऱ्यांना आपल्या शेतीत कोणते पीक चांगले येऊ शकते याची माहिती मिळू शकते. मात्र, काही शेतकरी मृदा परीक्षणाकडे पाठ फिरवतात.
असा आहे आरोग्य पत्रिका वितरणाचा तपशील
तालुका शेतकरी
गडचिरोली ५४८
चामोर्शी १२८८
मुलचेरा २००
धानोरा ५७९
देसाईगंज ५४४
आरमोरी १८५
कुरखेडा ९८
कोरची २
अहेरी ३८६
सिरोंचा १८६
एटापल्ली ७१२
भामरागड ०
जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे कोणते?
माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचे आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे नियोजन करणे सोयीचे होते.
माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात.
माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारसीत प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि तिची उत्पादकता वाढून पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात.