कोंबडी पळेना... लंगडी घालाया लागली...; कुक्कुट उत्पादकांसमोर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 08:15 AM2023-03-28T08:15:00+5:302023-03-28T08:15:01+5:30

Gadchiroli News कोंबड्याचे पाय अचानकच लुळे पडून त्यांचा तोल जात आहे. त्यानंतर त्यांना पायाने नीट चालता येत नाही. शरीर खंगून नंतर त्यांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

In the district, the chicken did not run... had to wear lame...; Crisis facing poultry producers | कोंबडी पळेना... लंगडी घालाया लागली...; कुक्कुट उत्पादकांसमोर संकट

कोंबडी पळेना... लंगडी घालाया लागली...; कुक्कुट उत्पादकांसमोर संकट

googlenewsNext

गोपाल लाजूरकर

गडचिराेली : जत्रा या मराठी चित्रपटातील कोंबडी पळाली, तंगडी धरून... लंगडी घालाया लागली... हे गीत प्रसिध्द आहे. जिल्ह्यात मात्र, सध्या कोंबडी पळेचना... खरोखरच लंगडी घालायला लागल्याच्या कुुक्कुट उत्पादकांच्या तक्रारी आहेत.

कोंबड्याचे पाय अचानकच लुळे पडून त्यांचा तोल जात आहे. त्यानंतर त्यांना पायाने नीट चालता येत नाही. शरीर खंगून नंतर त्यांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

उन्हाचा पारा वाढताच राणीखेत या विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे, त्यामुळे उत्पादकांसमोर संकट निर्माण झाले आहे.

उन्हाळ्यात काेंबड्यांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी हाेते. अशावेळी त्यांना समतोल आहार, शुद्ध हवेची आवश्यकता भासते. परंतु, याच काळात विपरीत वातावरण लाभते. तापमानवाढीमुळे काेबड्यांमधील राेग प्रतिकारशक्ती कमी हाेते. परिणामी त्यांच्या रोगजंतूंचा प्रवेश हाेताे. काेंबड्यांवर विविध राेगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्यात मरतुकीचे प्रमाण वाढतेच, शिवाय प्रजनन क्षमता कमी होऊन अंडी उत्पादनही घटते.

राणीखेत राेगाची लक्षणे काय?

राणीखेत हा रोग विषाणूजन्य राेग आहे. लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली हाेणे आदी लक्षणे दिसतात. तर मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोच्छवास, मंद भूक, ताप येणे, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होणे, निकृष्ट दर्जाची अंडी आदी लक्षणे दिसतात.

जनावरांचे लसीकरण मग काेंबड्यांचे का नाही?

जनावरांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जि. प. पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण माेहीम राबविली जाते. त्यामुळे जनावरे सुरक्षित हाेतात. परंतु, काेंबड्यांच्या बाबतीत ही माेहीम राबविली जात नाही. उन्हाळ्यात काेंबड्यांची राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने त्यांच्यावर विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. त्यादृष्टीने काेंबड्यांवर लसीकरण का केले जात नाही, असा प्रश्न आहे.

लसीचा तुटवडा

गडचिराेली जिल्ह्यात बऱ्यापैकी काेंबड्या पाळल्या जातात. काेंबड्यांचा प्रजनन दर माेठा असल्याने त्यांची संख्या निश्चत कधीच सांगता येत नाही. जी व्यक्ती काेंबड्या पाळते त्यांना सहज लस उपलब्ध करून देणे गरजेचे असते; परंतु तसे हाेत नाही. अनेकदा लसीचा तुटवडा जाणवताे. आतासुद्धा तीच स्थिती आहे. स्थानिक अधिकारी किंवा कर्मचारी कुक्कुटपालकांना याबाबत याेग्य मार्गदर्शन करत नाहीत.

 

राेगग्रस्त काेंबड्या धाेकादायक

ग्रामीण भागात दरवर्षीच उन्हाळ्यात तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला काेंबड्यांवर विषाणूजन्य राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. उपचाराअभावी अनेक काेंबड्या मरतात. काही कुक्कुटपालक मेलेल्या काेंबड्या फेकून देतात तर काहीजण काेबडी वाया का जाऊ द्यावी म्हणून त्या घरीच कापून शिजवून खातात. परंतु, प्रश्न अशा राेगग्रस्त काेंबड्या खाण्यायोग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काय खबरदारी घ्यावी?

उन्हाळ्यात राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने काेंबड्यांचे लसीकरण करावे. त्यांचे उन्हापासून संरक्षण करावे. सामान्य तापमान कसे राखता येईल, यासाठी खुराड्याभोवती रिकामी पाेती किंवा गाेणपाटांपासून थंडावा द्यावा. राणीखेत असाे वा अन्य राेगांमुळे मेलेल्या काेंबड्या कधीच खाऊ नयेत. तसेच राेगग्रस्त काेंबड्यांच्या संपर्कात इतर काेंबड्या येऊ देऊ नयेत.

 

उन्हाळ्यात राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने काेंबड्यांवर विविध राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. सध्या जर काेंबड्यांवर राेगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांना पशुचिकित्सालयात घेऊन जावे. काेंबड्यांच्या आजारावरील लक्षणे पाहून व त्यांचे रक्त नमुने घेतल्यानंतर तपासणीनंतरच नेमका काेणता राेग त्यांना झाला आहे, हे सांगता येईल.

-डाॅ. विलास गाडगे, उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्तालय, गडचिराेली

Web Title: In the district, the chicken did not run... had to wear lame...; Crisis facing poultry producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती