पहाटेच्या डुलकीने केला घात, मिरची मजुरांचे वाहन खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:49 PM2022-01-22T19:49:44+5:302022-01-22T22:12:42+5:30
Gadchiroli News मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला.
गडचिरोली : मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. यात चालक, क्लिनरसह २० मजूर गंभीर जखमी झाले. त्यातील ५ गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, मंडला जिल्ह्यातील मजूर गडचिरोली-आष्टीमार्गे तेलंगणा राज्यात सी. जी. ०९, जेजे ४८०० क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने जात हाेते. रात्रभराचा प्रवास झाल्यानंतर पहाटे अनखोडाजवळील वळणावर चालकाचा थोडी डुलकी आली आणि त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हे वाहन २०० मीटर दूर जाऊन खड्ड्यात उलटले.
वाहनात मिरची तोडणारे १७ मजूर तसेच चालक, क्लिनर व अन्य एक व्यक्ती बसली हाेती. शिक्षक संतोष नागरगोजे व इतर नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले. पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, राजू पंचफुलिवर, भाऊ फुंडगिर या पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यासाठी दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करून दिली.