आरमोरीत अपुरा पाणीपुरवठा
By admin | Published: June 27, 2017 12:52 AM2017-06-27T00:52:12+5:302017-06-27T00:52:12+5:30
वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहरवासीयांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने अनेक वॉर्डातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
टंचाई : १९ लाख लिटरची गरज मात्र मिळते सात लाख लिटर पाणी
विलास चिलबुले । लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहरवासीयांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने अनेक वॉर्डातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. लोकसंख्येनुसार आरमोरी शहरवासीयानां १९ लाख लीटर पाण्याची गरज आहे. मात्र येथील नळ पाणीपुरवठा योजना तोकडी असल्याने केवळ सात लाख लीटर पाणीपुरवठा नळाद्वारे होत आहे.
आरमोरी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गाढवी व वैनगंगा अशा दोन नद्यांवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेद्वारे शहरवासीयांना दररोज ६ लाख ८० हजार लीटर पाणीपुरवठा केला जातो. २०११ च्या जनगणनेनुसार आरमोरी शहराची लोकसंख्या २२ हजार ३४६ आहे. २०१७ वर्षातील सध्याची आरमोरी शहराची लोकसंख्या २७ हजारांच्या आसपास आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पंचायतीद्वारे नागरिकांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. शासनाच्या नियमानुसार शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिवसभर ७० लीटर पाण्याची गरज असते, आरमोरी शहराची सध्याची लोकसंख्या २७ हजार आहे. ऐवढ्या लोकसंख्येला दररोज १९ लाख लीटर पाण्याची गरज आहे. मात्र नळाद्वारे केवळ ६ लाख ८० हजार लीटर इतकाच पाणीपुरवठा होत आहे.
नळ योजनेअंतर्गत नदीपात्रातून इंटेक व्हेलमध्ये पाणी ओढण्यासाठी कमी विद्युत दाबाची मशीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरी शहरात पाणीपुरवठा होण्यासाठी बराच विलंब होतो. आरमोरी शहरात एक पाणी टाकी एक लाख लीटर तर दुसरी टाकी २ लाख ३० हजार लीटर क्षमतेची आहे. गाढवी नदीवरून येणाऱ्या पाणीटाकीची क्षमता ३.५० लाख लीटर आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख ८० हजार लीटरचा पाणीपुरवठा शहरात केला जातो.
गेल्या अनेक दिवसांपासून आरमोरी शहरातील बहुतांश वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बाजारपेठ, काळागोटा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात या वॉर्डातील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारीही दिल्या आहेत. आरमोरी शहरात अनेक मोठे दिग्गज नेते वास्तव्य करतात. मात्र शहरातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर कुठलाही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे चढ भागातील नागरिकांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
शहराच्या काही भागात नळाला एक दिवसाआड पाणी येते. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व नगर पंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन आरमोरी शहरासाठी नवी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, जेणेकरून आरमोरी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कामस्वरूपी मार्गी लागेल, अशी मागणी आहे.
मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार
शहरातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन आरमोरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी पाणीटंचाई असलेल्या संबंधित वॉर्डात विहीर व हातपंपावर सबमर्शिबल पाण्याची मशीन लावून नळांमार्फत पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे नियमित नळाचे पाणी न मिळणाऱ्या घरी पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.
अर्ध्या शहराला मिळते अशुद्ध पाणी
आरमोरी शहरात नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाते. यासाठी बर्डी परिसरात दोन तर शहराच्या मध्यभागी एक टाकी आहे. वैनगंगा नदीवरून येणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. हे फिल्टरयुक्त पाणी अर्ध्या शहराला बर्डी परिसर व शहराच्या काही भागातील कुटुंबांना मिळते. मात्र गाढवी नदीवरही दुसरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे जलशुद्धीकरण केंद्राची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे अर्ध्या शहराच्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या अनेक भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने काही नागरिक टिल्लूपंप लावून नळाचे अधिकाधिक पाणी खेचून घेतात. यामुळे काही कुटुंबांना पाणी मिळत नाही.
वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहराला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी आहे. आणखी पाणीपुरवठ्याची गरज असून वाढीव नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगर पंचायतीमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. सदर वाढीव नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यास पाणी समस्या मार्गी लागेल.
- सतीश चौधरी, मुख्याधिकारी,
नगर पंचायत, आरमोरी