आरमोरीत बुद्ध विहाराचे उद्घाटन
By Admin | Published: November 8, 2014 01:16 AM2014-11-08T01:16:04+5:302014-11-08T01:16:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्यावतीने आरमोरी येथे बांधण्यात आलेल्या तथागत बुद्ध विहाराचे उद्घाटन....
आरमोरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्यावतीने आरमोरी येथे बांधण्यात आलेल्या तथागत बुद्ध विहाराचे उद्घाटन भदंत डॉ. विमलकीर्ती गुणसिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी आरमोरी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत अनेक बौद्धबांधव सहभागी झाले होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार ठवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक प्रा. भालचंद्र खांडेकर, प्रा. नीरज बोधी, भदंत अमोलरत्न, भदंत धम्मवीर, भदंत जयवंत, भदंत करूणाबुध, स्मारक मंडळाचे सचिव विश्वनाथ गणवीर, प्रा. मदन मेश्राम उपस्थित होते. बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. न्याय, स्वातंत्र्य समता, बंधुता ही बुद्धाच्या विचारांची तत्व प्रणाली आहे. या धम्मातच मानवाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून धम्माचे प्रामाणिक पालन केल्यास संपूर्ण मानवाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत डॉ. विमलकीर्ती गुणसिरी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेची शिवकण असणाऱ्या बुद्धाच्या धम्मावर आधारित संविधान लिहून सगळ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देऊन एका संस्कृतीला नाकारणाऱ्या २२ प्रतिज्ञा दिल्या. मात्र आजही आम्ही जुन्या रूढी, प्रथा, परंपरा यात गुरफटलो आहोत. या रूढी, प्रथा, परंपरांना मूठमाती देऊन जीवनाला परिवर्तीत करणाऱ्या धम्माचे आचरण करावे, असे आवाहन प्रा. भालचंद्र खांडेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मदन मेश्राम, संचालन यशवंत जांभुळकर तर आभार किशोर सहारे यांनी मानले. (प्रतिनिधी)