जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 01:40 AM2016-01-05T01:40:43+5:302016-01-05T01:40:43+5:30
विज्ञानामुळे विकास झपाट्याने होत आहे. मात्र विज्ञानाचा वापर माणसावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी कायम वैज्ञानिक
अशोक नेते यांचे आवाहन : विद्यार्थी, शिक्षकांनो; वैज्ञानिक दृष्टिकोन कायम बाळगा
गडचिरोली : विज्ञानामुळे विकास झपाट्याने होत आहे. मात्र विज्ञानाचा वापर माणसावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी कायम वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून जिल्हा विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने समावेशीत विकासासाठी विज्ञान व गणित या मुख्य विषयावर आधारित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन सोमवारी थाटात झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून खासदार नेते बोलत होते.
१५६ पैकी ११० प्रतिकृती सादर
४तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी एकूण १५६ प्रतिकृतींची निवड करण्यात आली. यापैकी सोमवारला पहिल्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत केवळ ११० प्रतिकृतींची नोंदणी करण्यात आली व ११० प्रतिकृती प्रत्यक्षात सादर करण्यात आल्या. उर्वरित प्रतिकृती मंगळवारला सादर होतील, अशी माहिती आहे.
४गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी केतन देशमुख यांनी विज्ञान शिक्षक नरेंद्र उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनात ‘अॅन्टीथेट मोबाईल डायलर’ प्रतिकृती सादर केली. या प्रतिकृतीत सदर विद्यार्थ्याने दुचाकीच्या स्टँडच्या बाजुला एक भ्रमणध्वनी संच ठेवला. सदर दुचाकी कुणीही स्टँडवरून काढून इतरत्र नेण्याचा तसेच लंपास करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईलवर दुचाकी स्टँडलगत असलेल्या मोबाईलवरून स्वयंचलित फोन जातो. त्यामुळे दुचाकी लंपास होत असल्याचे तत्काळ निदर्शनास येते. दुचाकी चोरीवर आळा घालण्याच्या हेतूने तयार केलेल्या या नवख्या प्रतिकृतींचे खासदार, आमदारांसह साऱ्याच मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले.