राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे थाटात उद्घाटन
By admin | Published: October 2, 2016 02:04 AM2016-10-02T02:04:51+5:302016-10-02T02:04:51+5:30
गडचिरोली : शारीरिक शिक्षण, शिक्षक संघटना गडचिरोली, कृषी मित्र ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था गडचिरोली,
रविवारी होणार समारोप : राज्यभरातून खेळाडू गडचिरोलीत दाखल
गडचिरोली : गडचिरोली : शारीरिक शिक्षण, शिक्षक संघटना गडचिरोली, कृषी मित्र ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था गडचिरोली, गडचिरोली जिल्हा खो-खो असोसिएशन व आ. डॉ. देवराव होळी यांच्या संयुक्त विद्यमाने ५0 वी वरिष्ठ राज्यस्तरीय (महिला/पुरूष) खो-खो अजिंक्यपद स्पर्धा ३0 सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा प्रेक्षागार मैदान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्र्रदीप शिंदे, विदर्भ महासचिव रामदास दरणे, भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, प्रशांत वाघरे, रमाकांत ठेंगरी, रवींद्र्र ओल्लालवार, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, सुधाकर लाकडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण २ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी तर विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, प्राचार्य डॉ. प्रदीप घोरपडे, प्रा. डॉ. अनिता लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत विदर्भ खो-खो असोसिएशनने निवडलेले विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून एकूण २४ क्रीडा मार्गदर्शक पंच म्हणून काम पाहत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
नागपूर संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
५० व्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत राज्यभरातून एकूण २१ जिल्हा संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये पुरूषांचे ११ व महिलांच्या १० जिल्हा संघाचा सहभाग आहे. यात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला आदी जिल्हा संघांचा समावेश आहे. शनिवारी येथे खो-खो सामन्यांना सुरूवात झाली. पुरूष गटातील गडचिरोली व अकोला संघाचा सामना झाला. अकोला संघ विजय झाला. चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या संघात झालेल्या सामन्यामध्ये चंद्रपूरने विजयी मिळविला. वाशिम, वर्धा यांच्यात झालेल्या सामन्यात वर्धा तर भंडारा, अमरावती यांच्यात झालेल्या सामन्यात अमरावती तसेच चंद्रपूर, नागपूर यांच्यात झालेल्या संघात नागपूर संघाने विजयी मिळविला. महिला गटातील गडचिरोली, गोंदिया संघात झालेल्या सामन्यात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर संघात झालेल्या सामन्यात भंडारा, यवतमाळ, भंडारा यांच्यातील सामन्यात भंडारा व अकोला, अमरावतीमध्ये झालेल्या सामन्यात अमरावती जिल्हा संघाने विजय मिळविला.