धान पिकावर अळी, खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:50+5:302021-09-06T04:40:50+5:30
मागील वर्षी महापुरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. दरवर्षी तुडतुडा व विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतात मशागत व पीक लागवडीसाठी ...
मागील वर्षी महापुरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. दरवर्षी तुडतुडा व विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतात मशागत व पीक लागवडीसाठी केलेल्या खर्चापेक्षा कमी उत्पन्न मिळत असते, तर शेती दरवर्षी तोट्यात असल्याचे शेतकरी सांगत असतात. तरीही शेतकरी न डगमगता शेती करत असतो. यंदाच्या खरिपात जवळपास कोंढाळा परिसरात ९५०, तर कुरुड परिसरात ५५४ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. कृषी वीजपंप, इटियाडोह धरणाच्या सिंचन सुविधाअंतर्गत पीक वाचविण्यासाठी इटियाडोह धरणाचे पाणी उपलब्ध होते.
दरम्यान, खरीप हंगामाच्या प्रारंभात लागवड केलेल्या धान पिकावर खोडकिडा, अळी, गादमासी, आदी कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. तथापि, शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. औषधी व खताची मात्रा देत शेतकरी पीक वाचविण्यासाठी धावपळ करीत आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि अपर्याप्त पावसामुळे कीड रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकरी औषधी मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभास कीडरोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर्षी पण कीडरोगाच्या प्रादुर्भावास प्रारंभ झाला असून, काही भागात अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे. धान पिकावर अळी व खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.