नादुरूस्त ट्रॅक्टरने केला रस्ता जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:27 PM2018-01-01T23:27:51+5:302018-01-01T23:28:08+5:30
रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले.
आॅनलाईन लोकमत
देसाईगंज : रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र या ठिकाणी अतिशय अरूंद स्वरूपाचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे येथील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शहरवासीयांना आला.
लाखांदूर मार्गावरून काळी राख घेऊन येणारा ट्रॅक्टर ऐन भूमिगत पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली. परिणामी अनेक वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले.
देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली असून रेल्वेच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील भागाच्या मधोमधून रेल्वे मार्ग गेला असल्याने दोन्ही भागांना जोडणारा हा भूयारी मार्ग नव्याने सुरू झालेला आहे. जड वाहने याच भूयारी मार्गाने आवागमन करीत आहेत. वारंवार बंद होणाºया रेल्वे फाटकावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने देसाईगंज येथे भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र रेल्वे प्रशासन तथा स्थानिक प्रशासनाने बांधकामाच्या बाबतीत भविष्याचा विचार केला नाही. तसेच याबाबत कोणताही दुरदृष्टीकोन बाळगला नाही. परिणामी क्षुल्लक कारणामुळे या मार्गावर अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूमधून एकावेळी केवळ एकच वाहन काढता येते. त्यामुळे एखादे वाहन या ठिकाणी नादुरूस्त झाल्यास इतर वाहनधारकांची तारांबळ उडत असते. याचा प्रयत्य देसाईगंज शहरवासीयांना नेहमीच येत आहे. विशेष म्हणजे सकाळी १० वाजता असा प्रकार घडल्याने वाहनधारकांना मार्ग खुला होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
राख घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प पडली. सदर प्रकार यापुढे होऊ नये, याकरिता रेल्वे व स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.