जिल्ह्यात तेलवर्गीय भुईमूग, करडई पिकाच्या क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:41+5:30
रब्बी हंगाम सन २०१९-२२ मध्ये आरमोरी तालुक्यात रबी पिकाची पेरणी ७ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रात झाली असून, यात गहू, मका, हरभरा, लाखोळी, कडधान्ये पिकातील मूग, उडीद, पोपट, चवळी, मोठ तसेच तेलवर्गीय बियाणात भुईमूग, करडई, जवस याशिवाय भाजीपाला पिकात वांगी, टमाटर, कोबी, कारली, इतर भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र वाढत आहे.
प्रदीप बोडणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात धान पट्ट्यात खरिपाचा हंगाम आटोपला आणि थंडीची चाहूल लागली की रब्बीच्या हंगामाला सुरुवात होते. हिवाळ्यातील दवबिंदू रबीच्या पिकाला अतिशय पोषक ठरतात. यंदा आरमोरी तालुक्यात तेलवर्गीय पिकात भुईमूग, करडईच्या पिकाचे क्षेत्र वाढले असून, परंपरागतरीत्या लावणी जाणारी लाखोळी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे.
रब्बी हंगाम सन २०१९-२२ मध्ये आरमोरी तालुक्यात रबी पिकाची पेरणी ७ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रात झाली असून, यात गहू, मका, हरभरा, लाखोळी, कडधान्ये पिकातील मूग, उडीद, पोपट, चवळी, मोठ तसेच तेलवर्गीय बियाणात भुईमूग, करडई, जवस याशिवाय भाजीपाला पिकात वांगी, टमाटर, कोबी, कारली, इतर भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र वाढत आहे.
वाढत्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन या वर्षात शेतकऱ्यांनी तेलवर्गीय भुईमूग, करडई पिकात वाढ केली असून, आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात परंपरागतरीत्या घेतले जाणारे लाखोळी पिकाचे क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी, वैलोचना, गाढवी ,सती या नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भुईमूग पिकाचे उत्पादन घेतले जाते. पण भुईमूग पिकाची नवीन पद्धतीने शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. परिणामी उत्पादन क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मात्र त्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत नाही.
उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र वाढले असल्याने रबी पिकाच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. मिरची पिकाच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली असून, टरबूज पिकाचे क्षेत्र मागील पाच-सहा वर्षांत दुपटीने वाढले आहे.
गडचिराेली जिल्ह्यात लाखाेळी व चन्याच्या काेवळ्या व हिरव्या भाजीला माेठी मागणी आहे. ही संधी साधून येथील शेतकरी पहिल्या ताेड्याची लाखाेळीची भाजी ताेडून गडचिराेली शहराच्या बाजारपेठत विक्रीसाठी आणतात. धानासाेबतच काही शेतकरी बाेरूचीही शेती करीत असल्याचे दिसून येत आहे.
रबीच्या पीक पेऱ्यात यंदा झाली वाढ
- धान उत्पादक गडचिराेली जिल्ह्यात धानासाेबतच अनेक शेतकरी आता खरीप व रबी हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांनी बहू पीक पद्धतीकडे वळले आहेत. यावर्षी रबी पिकाच्या पेऱ्यात यंदा वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहीर, माेटारपंप आदी सुविधा झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता दुबार पिकाकडे वळले आहेत.
- गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून एकापेक्षा अधिक पिके घेण्याकडे आपला कल वाढविला आहे. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात अनेक शेतकरी पिके घेत आहेत.
- अधिकाधिक व बारमाही विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधा व यांत्रिकीकरणाचा सदुपयाेग करीत आहेत. त्यातल्या त्यात कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक व कृषी अधिकाऱ्यांचे वेळाेवळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी आता कृषी व्यवसायात प्रगती करीत आहेत.