दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ अन् दंड करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:21 PM2024-08-29T15:21:10+5:302024-08-29T15:21:58+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

Increase enforcement and fines for alcohol and tobacco control | दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ अन् दंड करा

Increase enforcement and fines for alcohol and tobacco control

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात २७ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आढावा घेत संबंधित विभागांना दारू व तंबाखू नियंत्रणासाठी नियोजन करून कायद्यानुसार कृती व दंड करण्याचे आदेश दिले.


या बैठकीला जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या सल्लागार डॉ. कुथे, जि. प. आरोग्य विभागाचे डॉ. गोरे, आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाचे पोरेड्डीवार, पोलिस विभाग एलसीबीचे उल्हास भुसारी, अन्न व औषध विभागाचे सुरेश तोरेम आदी प्रमुख अधिकारीसह इतर विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावेळी मागील बैठकीचा कार्यवृत्तांत व अनुपालन अहवालाचे वाचन किलनाके यांनी केले, तसेच मुक्तिपथ अभियानाचा कार्यवृत्तांत प्रभारी संचालक संतोष सावळकर यांनी सादरीकरण केले. अहवालातील मुद्यानुसार आढावा घेत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी उपस्थित विभागप्रमुख व प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीला कमलकिशोर खोब्रागडे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, अमरसिंग गेडाम, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या मीना दिवटे व दिनेश खोरगडे हजर होते.


अशी करा कृती... 
जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे. ज्या शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री केंद्र, पानठेले आहेत, ते शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापकाने हटविले पाहिजे. जिथे समस्या सुटत नाही त्या ठिकाणी पोलिस तक्रार करून ते हटविले पाहिजे. शाळा परिसरात शालेय वेळेत व्यसन करताना आढळल्यास सदर नोडल ऑफिसरने, समितीने कोट्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला दंड करावा.


एसटी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्या... 
एस. टी. महामंडळाच्या चालक व वाहकांनी दारू, तंबाखू खरांचे व्यसन करू नये. आगार व्यवस्थापकाद्वारा चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करावी. मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीने अवैध दारू व तंबाखू नियंत्रणासाठी कायदेशीर पद्धतीने ग्रामपंचायत पातळीला, गावात कृती करावी. सदर अहवाल ग्रामपंचायतनुसार बीडीओनी सीईओंना सादर करावा. अन्न औषध विभागाने सुगंधित तंबाखू विक्री विक्रेत्यावर कारवाया कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.


 

Web Title: Increase enforcement and fines for alcohol and tobacco control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.