सेवेनुसार अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:41 AM2021-09-12T04:41:51+5:302021-09-12T04:41:51+5:30
गडचिराेली : संघटनेच्या नेतृत्वात तब्बल एक महिना संप केल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्रातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना सेवेनुसार मानधनात वाढ करण्याचा ...
गडचिराेली : संघटनेच्या नेतृत्वात तब्बल एक महिना संप केल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्रातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना सेवेनुसार मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही सेवेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. ही वाढ तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
१० वर्ष, २० वर्ष व ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या अंगणवाडी सेविकास व मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, ही वाढ अजूनही देण्यात आली नाही. पाेषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याचे आदेश शासनाने काढले आहे. मात्र, बऱ्याच अंगणवाडी महिला अल्पशिक्षित असल्याने इंग्रजीतून माहिती भरण्याची सक्ती त्यांना करू नये, अशी मागणी कायम आहे. या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस सेवानिवृत्त झाल्या, अशांना सेवानिवृत्तीचा लाभ अजूनही मिळाला नाही. जे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खाेलीत आहेत त्यांना भाड्याचे पैसे मिळाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे टीए बिल प्रलंबित आहे.