आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदीची मर्यादा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:34+5:302021-06-03T04:26:34+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पणन हंगाम २०२०-२१ रब्बीमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीचे उद्दिष्ट १० हजार क्विंटल आहे. जिल्ह्यात ...
गडचिरोली जिल्ह्यात पणन हंगाम २०२०-२१ रब्बीमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीचे उद्दिष्ट १० हजार क्विंटल आहे. जिल्ह्यात भातपिकासह मका पिकाचे अंदाजे पाच लाख क्विंटल उत्पादन घेतले जाते. मागील वर्षीसुद्धा अंदाजे एक लाख क्विंटल मका पिकाचे उत्पादन झाले. या वर्षी केंद्र शासनाने जाहीर केलेला १८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा म्हणून माेठ्या प्रमाणात मका लागवड केली. जिल्ह्यात सध्या पाच लाख क्विंटल माल उत्पादित झालेला आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने महाराष्ट्राला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबईमार्फत ३ लाख क्विंटल १६ जिल्ह्यांत खरेदी करण्याचे आदेश दिले तर राज्यातील आदिवासी भागात दोन लाख क्विंटल मका खरेदीचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील फेडरेशनमार्फत फक्त १० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देऊन शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मका पिकाचे मोठे खरेदी व्यापारी नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लाॅकडाऊन व संचारबंदी आहे. असे असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनला १० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब मका उत्पादक शेतकऱ्यांना आपला उर्वरित मका कुठे व कसा विक्री करावा, ही अडचण आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण मका खरेदी करण्याकरिता अंदाजे एक लाख क्विंटल खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी; तसेच जिल्ह्यात गोडावून उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.