स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होणार वाढ

By admin | Published: June 12, 2017 01:02 AM2017-06-12T01:02:43+5:302017-06-12T01:02:43+5:30

तालुक्यातील वघाळा (जुना) येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. यावर्षी एक महिन्यापासून

Increase in migratory birds | स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होणार वाढ

स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होणार वाढ

Next

११ ते १३ हजारांवर वृद्धी : वघाळात घरटे बांधण्यास पक्ष्यांनी केली सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वघाळा (जुना) येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. यावर्षी एक महिन्यापासून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून चिंचेच्या झाडांवर घरटे बांधण्यास सुरू केले आहे. त्यामुळे यंदा जवळपास ११ ते १३ हजार पक्ष्यांमध्ये वाढ होणार, अशी शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
स्थलांतरित पक्ष्यांचे गाव म्हणून वघाळाची जिल्ह्यात ओळख आहे. वघाळा येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी पावसाळ्यात वास्तव्यास येतात. वर्षाचा अर्धाअधिक काळ ते वघाळा येथे घालवितात. यावर्षी आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी वघाळा शिवारातील काडीकचरा तसेच नदीतील वनस्पती, चिल्ला, काट्या आणून गावातील चिंचेच्या झाडांवर घरटे बांधण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यात विणीचा हंगाम असल्यामुळे घरट्यांमध्ये अंडी घालून जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत नवीन पिल्लांचा जन्म होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही संख्या ११ ते १३ हजाराच्या घरात जाईल, अशी शक्यता ग्रामस्थ व वन्यजीव पक्षी संरक्षण समितीने वर्तविली आहे.
वघाळा जुने हे गाव नदी तिरावर वसले असल्याने या गावात चिंचेचे झाड अधिक प्रमाणात आहेत. शिवाय लागून असलेल्या नदीमुळे पाण्यासह पक्ष्यांच्या खाद्याचीही व्यवस्था आहे. गावकऱ्यांचे पक्ष्यांविषयीचे प्रेम आणि पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ग्रामस्थ योग्य प्रकारे पार पाडत असल्यामुळे गावात पक्षी वास्तव्य करतात.

वनोद्यान पार्कचे काम पूर्ण करा
वघाळा येथे स्थलांतरित पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी अनेक पक्षीमित्र वघाळा येथे भेटी देतात. पक्षी पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकांचा ओघ गावाकडे वाढत आहे. पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन लोकांचे मनोरंजन व्हावे, या दृष्टीने वघाळा येथे वनोद्यान पार्क तयार करण्यात आले आहे. त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. या पार्कचे काम सुरू करावे. गावाला पक्षी पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने शासनाने वघाळा गावाला पक्षी पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, विकासासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, धनराज दोनाडकर, संदीप प्रधान सर्व सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Increase in migratory birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.