शिवभाेजन केंद्रांची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:59+5:302021-06-25T04:25:59+5:30
गडचिराेली : प्रत्येक तालुकास्तरावर एक शिवभाेजन केंद्र देण्यात आले आहे. काही माेठ्या गावांमध्येही या केंद्रांची गरज आहे. गडचिराेली ...
गडचिराेली : प्रत्येक तालुकास्तरावर एक शिवभाेजन केंद्र देण्यात आले आहे. काही माेठ्या गावांमध्येही या केंद्रांची गरज आहे. गडचिराेली शहराचा व्याप फार माेठा आहे. या ठिकाणी दाेनपेक्षा अधिक केंद्रांची गरज आहे.
जमिनीची अट रद्द करा
अहेरी : रोहयो अंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थींना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
विद्युत खांब द्या
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
अरुंद रस्त्यांमुळे त्रास
कुरखेडा : तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जातेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
थ्री-जी सेवा प्रभावित
सिरोंचा : सिरोंचा येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे आहे.
वसतिगृह निर्माण करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.
पालिकेचा कारभार राेजंदारी कर्मचाऱ्यांवर
गडचिराेली : स्थानिक नगर पालिकेच्या विविध विभागांत कर्मचाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत. परिणामी प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी राेजंदारी व काही कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर न. प. प्रशासनाच्या कामाचा डाेलारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडचिराेली नगर पालिकेत रिक्त पदांचा अनुशेष पूर्ण करण्यात आला नाही. सातत्याने मागणी हाेऊनही नगर विकास विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. गडचिराेली शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, याेजनांचा विस्तारही झाला आहे. त्या तुलनेत प्रशासकीय कामात गती आल्याचे दिसून येत नाही. विकासकामांवरही परिणाम हाेत आहे.
देलोडा मार्गाची दुरवस्था
गडचिराेली : तालुक्यातील पोर्ला-वडधा मार्गाची दुरवस्था झाली आहे. जवळपास ४ वर्षांपासून या मार्गाची केवळ डागडुजी केली जात आहे. या मार्गाने दररोज दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक होत असते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या रांगी ते बोरीमार्गे नियमित ये-जा करीत असतात. दिवसभर खासगी प्रवासी वाहतूकही होत असते. दिभना-अमिर्झा या १० किमीच्या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. विश्रामपूर-आंबेशिवणी या मार्गाची दुरवस्था झाली आहे.
तुटलेल्या खेळणी व साहित्याकडे दुर्लक्ष
गडचिराेली : वनविभागातर्फे स्थानिक चामोर्शी मार्गावरील सेमाना वनोद्यान निर्माण करण्यात आले असून, येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, या ठिकाणची खेळणी व झुले तसेच इतर साहित्याची तुटफूट झाली आहे. वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने याकडे लक्ष देऊन साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणची घसरपट्टी व इतर साहित्यांची दुरवस्था झाली आहे. समितीला पर्यटकांच्या शुल्काच्या रूपाने उत्पन्न मिळत असते. या उत्पन्नातून काही रक्कम वापरून सोयीसुविधा देण्याची गरज आहे. उद्यानाच्या देेखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचा कानाडाेळा झाला आहे.
वडदम-चिटूर मार्ग उखडला
सिराेंचा : तालुक्यातील वडदम ते चिटूर या सहा किमी मार्गाचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वडदम ते चिटूर हा मार्ग अतिदुर्गम गावांना जोडणारा आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वडदम व चिटूर येथील नागरिकांनी केली आहे. या भागात विकासाच्या नावाने बाेंब आहे. प्रशासनाचे नियाेजन ढासळल्यामुळे विकासात गती नसल्याचे दिसून येत आहे.
हातठेल्यांचे अतिक्रमण कायमच
आरमाेरी : येथील मुख्य मार्गावर जुन्या बसस्थानकापासून नवीन बसस्थानकापर्यंत अनेक लहान व्यावसायिक रस्त्यालगत हातठेले लावून विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांची विक्री करतात. सदर मुख्य मार्गावरून शेकडो वाहने आवागमन करतात. हातठेल्यांमुळे वाहतूक प्रभावित होत असते. पायदळ जाणाऱ्यांना त्रास होतो. शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम हाेणार आहे. त्यादृष्टीने अद्यापही अतिक्रमण हटाव माेहीम हाती घेण्यात आली नाही. पक्के अतिक्रमणही कायम असल्याने वाहतुकीस बरेचदा अडथळा निर्माण हाेताे. उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.
पथदिवे बंद, रस्त्यांवर अंधार
अहेरी : रस्त्याच्या दुतर्फा असलेले पथदिवे गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने पथदिवे लावावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नाल्याची संरक्षक भिंत अल्पावधीत झाली भुईसपाट
वैरागड : सन २०१७-१८ या वर्षात लाखो रुपयांचा निधी खर्च करून कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी नाल्याला संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, ही संरक्षक भिंत दोन वर्षांतच कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पुन्हा संरक्षक भिंतीचे काम करावे, अशी मागणी नागरिकांची आहे. सिंचाई उपविभाग कार्यालय कुरखेडाच्या वतीने सोनेरागी नाल्यावर सन २०१७-१८ या वर्षात संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले. पावसाळ्यात दुरून वाहत येणारे पाणी सोनेरागी जांभळी रस्त्यालगत नाल्याला जे वळण आहे, त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आपटून दरवर्षी नाल्याच्या काठाची माती खचून रस्त्याची आणि लगतच्या शेतजमिनीची हानी होत होती. त्यामुळे नाल्याच्या किनाऱ्याची होणारी हानी टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी संरक्षक भिंतीचे काम झालेे. मात्र, अल्पावधीतच भिंत काेसळली.
जारावंडीच्या टॉवरची रेंज वाढवा
एटापल्ली: एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. मोबाइलची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक नागरिकांनी मोबाइलची खरेदी केली आहे. जारावंडी परिसरातील जवळपास १० ते १२ किमी अंतरावरील गावकऱ्यांनीही मोबाइल खरेदी केले आहेत. मात्र, त्या गावांमध्ये कव्हरेज राहत नाही. बीएसएनएलचे सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेंज वाढविल्यास ग्राहकांना सेवा मिळण्याबरोबरच बीएसएनएलला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल. त्यामुळे येथील बीएसएनएल टॉवरची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माेबाइल सेवा नसल्याने प्रशासकीय कामेेसुद्धा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाडज गावाचा विकास रखडला
देसाईगंज : अखंड चंद्रपूर जिल्हा असताना पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज या गावाचे १९६१-६२ या साली तेव्हाच्या आरमोरी तालुक्यात व आताच्या देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्रामपंचायतीमध्ये जुनी लाडज येथील ३९५ कुटुंबांना ९९९ हेक्टर जागेवर नवी लाडज येथे पुनर्वसित करण्यात आले. मात्र, मागील ६० वर्षांनंतर या पुनर्वसित गावांसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध सोयीसवलती व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
जडवाहतुकीमुळे वैरागड-कढाेली मार्ग खड्ड्यात
वैरागड : छत्तीसगड-तेलंगणा अशी आंतरराज्यीय हाेणारी वाहतूक कुरखेडा-देसाईगंज-आरमाेरी-गडचिराेली या नियमित मार्गाने न हाेता कुरखेडा तालुक्यातील गाेठणगाव फाटा ते वैरागडमार्गे आरमाेरी तालुक्यातील ठाणेगाव अशी हाेते. या मार्गावरून चालणाऱ्या जडवाहनांमुळे या मार्गाची दुरवस्था झाली आहे. छत्तीसगड राज्यातून माेठमाेठी सामुग्री भरलेले ट्रक तेलंगणा राज्यात नेले जातात. ही जडवाहने राज्यमार्गानेच जाणे आवश्यक आहे. जिल्हा मार्गाच्या तुलनेत राज्यमार्ग रुंद व मजबूत बनविलेले असतात. मात्र, छत्तीसगड राज्यातून कुरखेडा तालुक्यात प्रवेश करणारी वाहने पुढे देसाईगंज, आरमाेरी, गडचिराेली या राज्य महामार्गाने न जाता गाेठनगाव फाटामार्गे वैरागड येथून आरमाेरी-गडचिराेली मार्गावरील ठाणेगावजवळ निघतात.
प्रवाशी निवारा दुर्लक्षितच
देसाईगंज: स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीतून विसाेरा येथील वडसा, कुरखेडा या राज्यमार्ग ३१४ च्या कडेला प्रवाशांच्या साेयीसाठी प्रवाशी निवारा बांधण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. पाेस्टर चिकटविल्याने देखणे रूप खराब झाले आहे. परिणामी प्रवाशी निवाऱ्याच्या बाहेर उन्हातान्हात उभे राहून विश्रांती घेणे पसंत करतात. प्रशासनाने सदर प्रवाशी निवाऱ्याची दुरुस्ती करावी. रंगरंगाेटी करून याला नवे रूप द्यावे, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून हाेत आहे. देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच प्रवाशी निवाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक निवाऱ्यांचे छत वादळाने उडून गेले आहे. भिंती तुटफूट झाल्या आहेत.