कामांची गती वाढवा
By admin | Published: April 14, 2017 01:20 AM2017-04-14T01:20:12+5:302017-04-14T01:20:12+5:30
शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.
आमदारांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावा
कुरखेडा : शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले.
राज्य शासनाच्या निर्देशासनुसार आ. क्रिष्णा गजबे यांनी कुरखेडा पंचायत समितीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला एसडीओ शुभांगी आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भुजबळ, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम, तहसीलदार अजय चरडे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक पुराम, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, उल्हास देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानावर राज्य शासनाने शेकडो कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमधील कामे नियोजनाअभावी ठप्प पडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. या कामांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काही गावांनी अजूनही कामे सुरू केली नसल्याचे दिसून आले. तर काही गावांमधील नागरिकांनी योग्य नियोजन केल्याने तेथील कामे पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर बाब आपल्या लक्षात आणून द्यावी, ती अडचण सोडविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले.
वीज व पाणी समस्येवर केली चर्चा
उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात वीज व पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी कुरखेडा येथील विश्रामगृहात तालुक्यातील वीज व पाणी समस्येचा आढावा घेतला. यावेळीसुद्धा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी ज्या गावातील हातपंप बंद आहेत, तेथील हातपंप तत्काळ दुरूस्त करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.