वनरक्षक व वनपालाच्या वेतनश्रेणीत वाढ करा
By admin | Published: May 26, 2017 02:26 AM2017-05-26T02:26:09+5:302017-05-26T02:26:09+5:30
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वेतनश्रेणी वाढीबाबत अनेकवेळा निवेदन सादर केले आहे
विद्यमान वनमंत्र्यांनीच केला होता पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वेतनश्रेणी वाढीबाबत अनेकवेळा निवेदन सादर केले आहे व पाठपुरावाही केला आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वनपाल व वनरक्षक संवर्ग ३ मध्ये मोडतात. वनरक्षक व वनपालांना वनरक्षण व वनसंवर्धनाचा पाया समजला जातो. वनरक्षक व वनपाल यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी यासाठी विरोधी पक्षात असताना राज्याचे विद्यमान वित्तमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता स्वत:च ते वनमंत्री आहेत. राज्याची आर्थिक तिजोरी त्यांच्या हातात आहे. त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न सहज सुटणे शक्य आहे.
राज्यात सर्वाधिक जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे वनपाल व वनरक्षकांची संख्या गडचिरोली जिल्ह्यातच अधिक आहे. वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत. मागील सहा वर्षांपासून वनपाल व वनरक्षक यांच्या वेतनश्रेणी वाढीसाठी ते प्रयत्न करीत आहेत. वनकर्मचाऱ्यांच्या समस्येची ना. मुनगंटीवार यांना जाण आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वनपाल व वनरक्षकांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्याची मागणी आहे.